बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात
सीसीटीव्हीची नजर, भरारी पथकांद्वारे तपासणी : परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त
प्रतिनिधी/ बेळगाव
बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी कन्नड व अरेबिक या विषयाचे पेपर घेण्यात आले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यामध्ये शांततेत पेपर झाले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी परीक्षा केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावर्षी परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती.
शनिवारी सकाळी बेळगावच्या ट्रेझरी कार्यालयापासून प्रत्येक परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचविण्यात आल्या. पहिला दिवस असल्याने सकाळी 8 वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पालकांसह हजर होते. कॉपी प्रकारांना आळा घालण्यासाठी फ्लॉईंग्ज स्कॉड तयार करण्यात आले होते. या पथकाकडून परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करण्यात येत होती.
परीक्षा केंद्रांच्या सीसीटीव्हीचे फुटेज बेळगावच्या जिल्हा पंचायत कार्यालयात वेब कॉस्टींग केले जात होते. कोठेही गैरप्रकार होणार नाही, याची खबरदारी केंद्रप्रमुख तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली होती. डिजिटल घड्याळ घातलेल्या विद्यार्थ्यांना केंद्राबाहेरच रोखण्यात आले. घड्याळ काढून ते पालकांकडे देण्याच्या सूचना करण्यात आल्या. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात सुरळीतपणे बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली.
पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांची दांडी
कन्नड विषयासाठी 12420 परीक्षार्थीनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 12129 विद्यार्थी शनिवारी परीक्षेसाठी उपस्थित होते. उर्वरीत 291 विद्यार्थ्यांनी कन्नड पेपरला दांडी मारली. त्यामुळे दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत आणण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.