For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बारावीचा निकाल यंदा सर्वात कमी काळात

01:14 PM Mar 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
बारावीचा निकाल यंदा सर्वात कमी काळात
Advertisement

केंद्रांमध्ये वाढ, यंत्रणा, शिक्षकांमुळे झाले शक्य : गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेट्यो यांची माहिती

Advertisement

पणजी : उत्तरपत्रिका तपासणी केंद्रात करण्यात आलेली वाढ, तपासणीनंतर कोड नंबराप्रमाणे गुण थेट उमेदवारांच्या (विद्यार्थी) नावावर जमा करण्यात (अपलोड) येणारी यंत्रणा आणि शिक्षकांचे सहकार्य याच्या जोरावर सर्वात कमी दिवसात बारावीचा निकाल लावण्याचे कसब साध्य केले, अशी माहिती गोवा बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेट्यो यांनी दिली. बोर्डाच्या इतिहासात हा एक प्रकारचा कमी दिवसांतील निकालाचा विक्रमच ठरल्याचे दिसून येत आहे. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (गोवा बोर्ड) अध्यक्ष शेट्यो यांना सर्वात कमी दिवसातील निकालाचे रहस्य विचारले असता ते म्हणाले की, बारावीच्या परीक्षेला सुमारे 17 हजार मुले बसली होती. त्यांची परीक्षा 10 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीत घेण्यात आली. त्यानंतर 17 दिवसात बारावीच्या परीक्षेचा निकाल लावण्यात प्रथमच यश लाभले.

तपासणी केंद्रे चारवरुन सहा

Advertisement

या आधी उत्तर गोव्यात दोन आणि दक्षिण गोव्यात दोन अशी चार उत्तरपत्रिका तपासणी केंद्रे होती. ती यावर्षी दोनने वाढवून सहा करण्यात आली. प्रत्येक केंद्रात 15 ते 20 च्या आसपास उच्च माध्यमिक विद्यालयांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम सोपवण्यात आले. एकूण 4000 ते 4500 शिक्षकांकडे ते काम देण्यात आले आणि सकाळी 8.30 ते सायं. 5 अशी वेळ देऊन उत्तरपत्रिकांची तपासणी करण्यात आली. त्यासाठी एक टीम तयार करुन एकंदरित निकाल प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात आली म्हणून हे शक्य झाल्याचे शेट्यो यांनी नमूद केले.

या निकालासाठी संगणक शिक्षकांचाही हातभार लागला. उत्तरपत्रिकांची तपासणी झाल्यानंतर गुण थेट नोंदवण्यात आले. प्रत्येक विषयाचे गुण यंत्रणेच्या माध्यमातून थेट जमा करण्यात आले. परीक्षार्थिंना बोर्डातर्फे कोड नंबर देण्यात येतो. तेथे नाव कळत नाही. त्या कोड नंबरप्रमाणे सर्व विषयांचे गुण जमा करुन यंत्रणेत निकाल पक्का करण्यात आला. म्हापसा, सांखळी, कुंकळ्ळी, मडगांव इत्यादी विविध तपासणी केंद्रे बोर्डाशी संलग्न करुन निकाल थेट बोर्डाच्या यंत्रणेत बसवण्यात आला. दोन वर्षापेक्षा जास्त अनुभवी शिक्षकांकडे तपासणीचे काम देण्यात आले आणि त्यांनी जबाबदारीने ते पूर्ण केले, असे शेट्यो यांनी सांगितले.

दहावीसाठी 8 तपासणी केंद्रे

शेट्यो यांनी पुढे सांगितले की, दहावी परीक्षेचा निकाल लवकर लागावा म्हणूनही प्रयत्न सुरु झाले असून यंदा 21 हजारच्या आसपास मुले परीक्षेला बसली आहेत. सध्या परीक्षा चालू असून तपासणी केंद्रे 3 वरुन 5 ने वाढवून 8 करण्यात आली आहेत. त्यामुळे दहावीचा निकालही सर्वात कमी दिवसात लागण्याची अपेक्षा आहे. बारावीसारखीच यंत्रणा दहावीसाठी राबवण्यात येणार असून 9 एप्रिलला दहावीचा शेवटचा पेपर आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु होणार असून 15 एप्रिलनंतर दहावीचा निकाल कधीही लागण्याची शक्यता वर्तवली आहे.

Advertisement
Tags :

.