बहराइच हिंसाचारातील संशयितांशी चकमक
पाच संशयितांना अटक : संघर्षादरम्यान दोघे जखमी : नेपाळला पळून जाण्यापूर्वी कारवाई
वृत्तसंस्था/लखनौ
उत्तर प्रदेशातील बहराइच जिह्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणातील पाच मुख्य संशयित आरोपींना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. नेपाळला पळून जाण्यापूर्वी संबंधितांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईवेळी सुरक्षा अधिकारी आणि संशयित आरोपींमध्ये चकमक झाली असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बहराइच हिंसाचार प्रकरणात सहभागी असलेले संशयित नेपाळला जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी व्यापक व्यूहरचना केली. त्यानुसार वेगवेगळी पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आली.
याचदरम्यान पोलिसांची संशयित आरोपींसमवेत चकमक झाली. सर्फराज उर्फ रिंकू आणि मोहम्मद तालीम उर्फ साबलू अशी चकमकीत जखमी झालेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या बेतात होते. घटनेच्या दिवसापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. गुरुवारी पोलिसांना त्यांचे लोकेशन मिळाल्यानंतर त्यांचा माग काढण्यात आला. चकमकीसंदर्भात पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी बैठक सुरू झाली होती. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या एडीजींसह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीपूर्वी पोलिसांनी पाच आरोपींना पकडल्याची माहिती देण्यात आली. तथापि, सविस्तर माहिती देण्यात आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील दोघांना चकमकीत गोळ्या लागल्या. ही घटना नेपाळ सीमेजवळील हांडा बसेहरी कालव्याजवळ घडली आहे. जखमी आरोपींवर उपचार करणाऱ्या सामुदायिक आरोग्य केंद्र नानपारा येथील डॉक्टरांनी दोघांच्याही पायाला गोळी लागल्याचे सांगितले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा ऊग्णालयात रेफर करण्यात आले होते.