थेट प्रक्षेपणावरून विधानसभेत खडाजंगी
विरोधी पक्षाकडून सरकारवर आरोप : सत्ताधारी आमदारांचे प्रत्यारोप : गदारोळामुळे कामकाज तहकूब
प्रतिनिधी/ बेंगळूर
विधानसभेतील कामकाजाच्या थेट प्रक्षेपणावेळी विरोधी पक्षातील आमदारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विरोधी पक्षातील आमदारांच्या दिशेने व्हिडिओ कॅमेरा केंद्रित केले जात नसल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी विधानसभेत शाब्दिक चकमक, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यामुळे सभागृहात गदारोळ माजल्याने कामकाज काही वेळेसाठी तहकूब करावे लागले.
विधानसभेत प्रश्नोत्तर सत्त, शून्य तासाचे कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गोंधळाबाबत स्थगन प्रस्ताव मांडत असताना भाजप आमदार अरविंद बेल्लद उभे राहिले. ते म्हणाले, कामकाजाच्या थेट प्रक्षेपणावेळी विरोधी पक्षातील आमदारांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते बोलत असले तरी ते थेट प्रक्षेपणात दाखविले जात नाही. हे योग्य नाही. सोमवारी विधिमंडळ कामकाज सल्ला समितीच्या बैठकीतही हा मुद्दा आम्ही मांडला होता. तरी सुद्धा विरोधी पक्षातील आमदारांच्या बाबतील सरकारचे धोरण योग्य नाही, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर टीका केली. थेट प्रक्षेपणादरम्यान विरोधी पक्षांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या अनादर करणे योग्य नाही. सरकारने चूक दुरुस्त करावी, अशी मागणी यत्नाळ यांनी केली.
थेट प्रक्षेपणाची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्याला!
पुन्हा बोलताना आमदार बेल्लद यांनी, थेट प्रक्षेपणाचे काम पूर्वी वार्ता आणि जनसंपर्क खात्याकडे होते. आता ते एका काँग्रेस कार्यकर्त्याला दिल्याची माहिती मिळाली आहे. ही बाब योग्य नाही, अशी टिप्पणी केली. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसमधील सर्व आमदारांनी उभे राहून अरविंद बेल्लद यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. आरोप-प्रत्यारोपामुळे सभागृहात गोंधळ माजला. गदारोळात मंत्री प्रियांक खर्गे यांनी बोलण्यास सुरुवात केली. भाजपच्या काळात केलेली व्यवस्था यापुढेही सुरु ठेवण्यात आली आहे. आम्ही काही नवी व्यवस्था केलेली नाही, असा टोला विरोधी आमदारांना लगावला.
त्वरित दखल घेण्याची सभाध्यक्षांकडे मागणी
त्यावेळी बेल्लद यांनी, मंत्री महोदय कामकाजावेळी अनावश्यक मुद्द्यांवर बोलतात. ते थांबवून कामकाजाचे थेट प्रसारण व्यवस्थेत विरोधी पक्षांकडेही लक्ष केंद्रित करावे, अशी सभाध्यक्ष यु. टी. खादर यांच्याकडे केली. त्यावेळी सभागृहात पुन्हा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. तेव्हा सभाध्यक्षांनी “मी बघतो, तांत्रिक बाबींकडे लक्ष देऊन त्यात दुरुस्ती करतो,” असे सांगितले. परंतु, विरोधी पक्षाच्या आमदारांनी घोषणाबाजी करत “’विरोधी आमदारांकडे असे दुर्लक्ष करणे योग नाही. आताच मागणीची दखल घ्या”, अशी मागणी केली.
कामकाज 10 मिनिटे तहकूब
त्यानंतर भाजपचे व्ही. सुनीलकुमार यांनी सत्ताधारी आमदारांना उद्देशून चिमटा काढला. त्यावर काँग्रेस आमदार नारायणस्वामी यांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सभागृहात पुन्हा खडाजंगी झाली. सभाध्यक्षांनी सर्व आमदारांना जागेवर आसनस्थ होण्यास सांगितले. तरीही सत्ताधारी-विरोधी आमदारांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरुच ठेवल्याने सभाध्यक्षांनी कामकाज 10 मिनिटे तहकूब केले. दहा मिनिटांनी पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर सभाध्यांनी या मुद्द्यावर बोलण्यास मुभा न देता कामकाज भोजन विरामापर्यंत पुढे ढकलले.