For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री विसर्जन मिरवणुकीतील वादानंतर टेंगिनकेरा गल्लीत तुंबळ हाणामारी

08:10 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्री विसर्जन मिरवणुकीतील वादानंतर टेंगिनकेरा गल्लीत तुंबळ हाणामारी
Advertisement

पोलिसांकडून लाठीमार : दोन्ही गटातील सहा जण जखमी, सात जणांना अटक

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

श्री विसर्जन मिरवणुकीच्या वेळी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान रविवारी रात्री उशिरा तुंबळ हाणामारीत झाले आहे. टेंगिनकेरा गल्लीत ही घटना घडली असून हाणामारीनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीहल्ला केल्याचीही माहिती मिळाली आहे. यासंबंधी परस्परांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले असून दोन्ही गटातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

राजू शेडगे (वय 25), विशाल तुकाराम ताशिलदार (वय 41) दोघेही राहणार टेंगिनकेरा गल्ली, सतीश नंदू घसारी (वय 46) मूळचा राहणार टेंगिनकेरा गल्ली, सध्या राहणार रुक्मिणीनगर, विनित विनायक बडमंजी (वय 18) राहणार माळी गल्ली, सुजल साहेबराव कोळी (वय 22) राहणार जालगार गल्ली, अक्षय संतराम गडकरी (वय 27), संकेत किरण अष्टेकर (वय 24) दोघेही राहणार खडक गल्ली अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रविवार दि. 27 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हाणामारीची घटना घडली आहे. या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमनी, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक, पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्री विसर्जन मिरवणूक आटोपून विश्रांती घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना लगेच अॅक्शन मोडमध्ये यावे लागले.

आदित्य राजू अळवाणी (वय 22) राहणार खडक गल्ली या तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून पंधराहून अधिक जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर राजू शेडगे (वय 25) राहणार टेंगिनकेरा गल्ली या तरुणाच्या फिर्यादीवरून सुमारे 15 हून अधिक जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास करण्यात येत आहे. श्री विसर्जन मिरवणुकीच्या वेळी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणावरून रविवारी रात्री 11 ते 11.30 या वेळेत दोन गटात हाणामारी झाली आहे.

हाणामारीत सहा जण जखमी झाले आहेत. मिरवणुकीत झालेल्या भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेले असता दोन गटात हाणामारी झाली आहे. भेंडीबाजार सर्कल, टेंगिनकेरा गल्ली कॉर्नर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर रविवारी रात्री उशिरा एकच धावपळ उडाली. काठ्या व विळ्याने मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

  26 हून अधिक जणांवर एफआयआर दाखल

हाणामारी प्रकरणी 26 हून अधिक जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा सात जणांची धरपकड केली आहे. एका प्रकरणातील अकरा जण तर आणखी एका प्रकरणातील पंधरा जण फरारी झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Advertisement
Tags :

.