For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जागेच्या वादातून बकरी मंडईत धुमश्चक्री

01:05 PM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
जागेच्या वादातून बकरी मंडईत धुमश्चक्री
Advertisement

दोन गटात हाणामारी, दगडफेक : पाचहून अधिक जखमी: दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू : परिसरात बंदोबस्त कायम

Advertisement

बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून गणाचारी गल्लीतील बकरी मंडईच्या जागेतून धुमसत असलेला जागेचा वाद मंगळवारी रात्री उफाळून आला. रात्री 8 च्या दरम्यान दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी बिअरच्या बॉटल्स आणि दगडफेक करण्यात आल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये दोन्ही गटांतील पाचहून अधिक जण जखमी झाले असून दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खडेबाजार पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली असून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला असता तर ही घटना घडली नसती. पोलिसांचा दुर्लक्षपणा या घटनेस कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. सुरेश लाटे (वय 28), राजू तळवार (वय 30, दोघेही रा. गणाचारी गल्ली) अशी एका गटातील जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर दुसऱ्या गटातील उदय घोडके, अनिकेत भोसले, रोहन घोडके यांच्यासह अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. गणाचारी गल्लीतील बकरी मंडई येथील जागेवरून गेल्या काही दिवसांपासून दोन गटात वाद सुरू आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेत काहींनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी गल्लीतील रहिवासी आणि नगरसेवक शंकर पाटील यांच्याकडून केली जात होती. याबाबत जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिकेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले होते. सदर जागेवरील अतिक्रमण हटवून त्याठिकाणी समुदाय भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी 20 लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. मात्र गेल्या 100 वर्षांपासून बकरी मंडईत बकरी बाजार भरतो. खाटीक समाजाचे बीरदेव मंदिर देखील त्याठिकाणी आहे. त्यामुळे समुदाय भवन उभारण्यात येऊ नये, बकरी मंडई कायम रहावी, अशी मागणी खाटीक समाजाच्यावतीने केली जात होती. यासाठी जिल्हाधिकारी व महानगरपालिकेलाही निवेदन देण्यात आले होते.

Advertisement

बकरी मंडईतील जागेचे मोजमाप

त्यानुसार मंगळवारी दुपारी महापालिका आणि सीटी सर्व्हेचे अधिकारी बकरी मंडईतील जागेचे मोजमाप करून हद्द निश्चित करण्यासाठी आले होते. सायंकाळपर्यंत अधिकाऱ्यांनी जागेचे मोजमाप करून हद्द निश्चित केली. मात्र दुपारपासूनच दोन्ही गटातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने त्याठिकाणी जमले होते. अधिकारी मोजमाप उरकून निघून गेले तरीदेखील दोन्ही गटातील नागरिक मात्र बकरी मंडईत थांबून होते. जागेच्या वादातून दोन गटातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी काठी, बियर बॉटल्स, दगड फेकण्यासह लाथा बुक्क्यांनी मारहाण झाल्याने दोन गटातील पाचहून अधिक जण जखमी झाले. यापैकी गणाचारी गल्लीतील सुदेश आणि राजू हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बकरी मंडईपासून ते गवळी गल्ली, खडेबाजार पोलीस स्थानक परिसर आणि रिसालदार गल्लीपर्यंत नागरिकांची अचानक धावपळ सुरू झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमावाने फेकलेले दगड आणि विटा नार्वेकर गल्लीपर्यंत येऊन पडले होते. दोन गटात जोरदार राडा झाला तरीदेखील हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस मात्र सुस्त होते. आरडाओरड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हाणामारीत अनेक जण जखमी झाले. एका गटातील महिलांनी खडेबाजार पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी जर वेळीच हस्तक्षेप केला असता तर कदाचित ही घटना घडली नसती, अशी चर्चा सुरू आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र खबरदारी म्हणून बकरी मंडई परिसरात पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला होता.

पोलीस उपायुक्तांची घटनास्थळी भेट

बकरी मंडईत जागेच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याने तणावाची घटना घडल्याची माहिती खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली. काही वेळानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बीरदेव मंदिर परिसराची पाहणी करण्यासह उपस्थितांकडून माहिती जाणून घेतली.

पोलीस वाहनावर हल्ला

दोन गटात धुमश्चक्री उडाल्यानंतर एकच धावपळ उडाली. साध्या वेशातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. तसेच दुसऱ्या गटातील एका तऊणाला पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात कोंबले. त्यानंतर तऊणाला पोलीस स्थानकाकडे आणले जात होते. मात्र  दुसऱ्या गटातील संतप्त जमावाने पोलीस वाहन रस्त्यात अडविले. त्याचबरोबर लाठ्या- काठ्या घेऊन पोलीस वाहनावर हल्ला चढविला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत जमावाला बाजूला करत वाहन पोलीस स्थानकापर्यंत आणले. पण यामध्ये पोलीस वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले.

Advertisement
Tags :

.