बळ्ळारीत दोन गटात धुमश्चक्री
गोळीबारात कार्यकर्त्याचा मृत्यू : बॅनर लावण्यावरून वाद
बेंगळूर : गंगावतीचे आमदार गाली जनार्दन रेड्डी यांच्या बळ्ळारीतील निवासस्थानासमोर बॅनर लावण्यावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला. दोन गटात दगडफेक, हवेत गोळीबाराची घटना घडली. यावेळी बंदुकीतून झाडलेली गोळी लागून एका कार्यकर्त्याचा बळी गेला. या घटनेनंतर प्रक्षुब्ध जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेमुळे बळ्ळारी शहरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, 3 जानेवारी रोजी बळ्ळारीत महर्षि वाल्मिकींच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बळ्ळारी शहरातील हवंभावीनगर येथील आमदार जनार्दन रेड्डींच्या बंगल्यासमोर एका गटाने बॅनर लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी जनार्दन रेड्डींच्या समर्थकांनी बॅनर लावण्यास आक्षेप घेतला. यावेळी दोन गटात शाब्दिक चकमक झाली.
कल्याण राज्य प्रगती पक्षातून निवडून आल्यानंतर भाजपमध्ये पक्ष विलीन केलेले आमदार जनार्दन रेड्डी व काँग्रेसचे आमदार नारा भरतरेड्डी यांच्या गटातील समर्थकांमध्ये जुंपली. दोन्ही गटातील वाद सोडविण्यासाठी तेथे माजी मंत्री बी. श्रीरामुलू दाखल झाले. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद चिघळला. यावेळी दोन्ही बाजूंनी तुफान दगडफेक झाली.एका नेत्याच्या गनमॅनने हवेत गोळीबार गेला. तर दुसरीकडे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, हवेत गोळीबार केला. दरम्यान, गोळी लागल्याने राजशेखर नामक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बळ्ळरी शहरात तणावाचे वातावरण असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. राजशेखरचा मृतदेह जिल्हा इस्पितळात हलविण्यात आला आहे. वाद निर्माण झाला तेव्हा घटनास्थळी जनार्दन रेड्डी, आमदार नारा भरतरेड्डी व त्यांचा निकटवर्तीय सतीश रेड्डी हे देखील होते. दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. कोणाच्या गोळीबारात राजशेखर बळी गेला, हे अद्याप उलगडलेले नाही.
जमावबंदीचा आदेश जारी
खबरदारी म्हणून जनार्दन रेड्डींच्या निवासस्थान परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांकडून धरपकड सुरू होती. कोप्पळ व विजयनगर जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे.
गुंडांना सोबत घेऊन दडपशाही : जनार्दन रेड्डी
घटनेविषयी प्रतिक्रिया देताना आमदार जनार्दन रेड्डी यांनी, मी कारमधून उतरल्यानंतर गोळीबाराची घटना घडली आहे. मला टार्गेट करून आमदार नारा भरतरेड्डी यांच्या गनमॅननी फायरींग केली आहे. वाल्मिकी पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमावरून गोंधळ माजविण्यात आला आहे. गुंडांना सोबत घेऊन दडपशाही केली जात आहे, असा आरोप केला.