Solpaur : समाईक विहिरीच्या पाणी पाळीवरून दोन गटात हाणामारी
सलगर बु येथे विहिरीच्या पाण्याच्या पाळीचा वाद
मंगळवेढा : सलगर बु येथे समाईक विहिरीच्या पाण्याच्या पाळीचा वाद मिटविण्यासाठी आलेल्या दोन गटात हाणामारी व दोन महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी बिराप्पा हिप्परकर, विलास हिप्परकर, अंकुश हिप्परकर, अजित हिप्परकर, यल्लाप्पा हिप्परकर, लक्ष्मण हिप्परकर, सुनील हिप्परकर, विनोद हिप्परकर आदी आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
फिर्यादी महिला १ जानेवारी रोजी रात्री ७.३० वा. तिच्या पतीसह घरी असताना अजित हिप्परकर याने यल्लाप्पा हिप्परकर यांच्या मोबाईलवर फोन करून विहिरीच्या पाण्याच्या पाळीचा वाद मिटवायचा आहे, तुम्ही आमच्या घरी या असे म्हणाले. घरी गेले असता फिर्यादीच्या पतीला आरोपीकडून शिवीगाळ का करतोस असे म्हणताच त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीला खाली पाडून मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीच्या गळ्यातील गंठण पडून गहाळ झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
दुसऱ्या घटनेत ३५ वर्षीय फिर्यादी महिला व तिचा पती घरी असताना अजित हिप्परकर यांचा फोन पतीच्या मोबाईलवर आला. विहिरीच्या पाण्याच्या पाळीची तक्रार मिटवायची आहे, तुम्ही घरी या असे म्हणाले. फिर्यादीसह सर्वजण घरी गेले असता मोटारीचा फ्युज का काढता असे विचारले असता चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीस खाली मारून मनास लज्जा बाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही घटनेत एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलीस याचा तपास करीत आहेत.