काठमांडूत राजेशाही समर्थक-सुरक्षा दलांदरम्यान झटापट
नेपाळच्या अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू : हिंदू राष्ट्र जाहीर करण्याच्या मागणीला जोर
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये शुक्रवारी राजेशाही पुन्हा स्वीकारण्याची आणि हिंदू राष्ट्राचीमागणी करणारे समर्थक आणि सुरक्षा दलांदरम्यान चकमक झाली आहे. या झटापटाती अनेक पोलीस जखमी झाल्याने राजधानीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. निदर्शकांनी अनेक घरे, इमारती आणि वाहनांना पेटवून दिले. तर निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूर अन् रबरी गोळ्यांचा मारा केला. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने टिंकुने, सिनामंगल आणि कोटेश्वर क्षेत्रांमध्ये संचारबंदी लागू केली आहे. झटापटीत एका निदर्शकाचा मृत्यू झाला आहे. तणावपूर्ण स्थिती पाहता आता रस्त्यांवर सैन्य तैनात करण्यात आले आहे.
निदर्शकांनी सुरक्षा कडे तोडण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर दगडफेक केल्यावर ही झटापट झाल्याचे समजते. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रूधूराचा मारा केला. यादरम्यान निदर्शकांनी एक व्यावसायिक इमारत, शॉपिंग मॉल, राजकीय पक्षाचे मुख्यालय आणि एका प्रसारमाध्यमाच्या इमारतीला पेटवून दिले. यामुळे 12 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. निदर्शनांमध्ये राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षासमवेत (आरपीपी) अन्य राजेशाही समर्थक समूह सामील झाले हेते.
राजेशाही स्वीकारण्याची मागणी
हजारो निदर्शकांनी नेपाळचा ध्वज फडकवत आणि पूर्वाश्रमीचे राजे ग्यानेंद्र शाह यांचे छायाचित्र हातात घेत ‘राजा आणा, देश वाचवा’, ‘भ्रष्ट सरकार मुर्दाबाद’ आणि ‘आम्हाला राजेशाही परत हवी’ अशा घोषणा दिल्या. स्थिती पाहता दंगलविरोधी पथकाला तैनात करण्यात आले आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नेपाळने 2008 साली संसदेच्या माध्यमातून राजेशाही समाप्त केली होती. यामुळे एक धर्मनिरपेक्ष, संघीय, लोकशाहीवादी प्रजासत्ताक देश ठरला होता. अलिकडच्या काळात राजेशाही पुन्हा स्वीकारण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. पूर्वाश्रमीचे राजे ग्यानेंद्र यांनी 19 फेब्रुवारी रोजी लोकशाही दिनी जनतेला समर्थनाचे आवाहन केले होते. चालू महिन्याच्या प्रारंभी ग्यानेंद्र हे धार्मिक यात्रेवरून परतल्यावर त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर राजेशाही समर्थकांनी त्यांचे स्वागत केले होते.
राजेशाहीला वाढते समर्थन
नेपाळमध्ये हिंदू राजेशाही बहाल करण्याच्या मागणीवरून एक मजबूत आंदोलन आकार घेत आहे. याचे मुख्य कारण देशातील भ्रष्टाचार आणि आर्थिक घसरणीमुळे जनतेत वाढणारी निराशा आहे. नेपाळमध्ये 2008 पासून 13 वेळा सरकार बदलले असून देशात राजकीय अस्थिरतेची स्थिती आहे.