केरळमध्ये वकील-विद्यार्थ्यांदरम्यान झटापट
20 जखमी : पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
वृत्तसंस्था/ कोची
केरळमध्ये विद्यार्थी संघटना एसएफआयचे कार्यकर्ते आणि वकिलांदरम्यान झटापट झाली असून यात 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एर्नाकुलम जिल्हा न्यायालय परिसरात जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक समारंभादरम्यान ही घटना घडली आहे.
एसएफआय कार्यकर्त्यांनी बार असोसिएशनच्या वार्षिक समारंभात बळजबरीने शिरत मोठा गोंधळ घातला आहे. तेथे झालेल्या झटापटीत एफएसआयचे 16 कार्यकर्ते आणि 8 वकील जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महाराजा कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी बार असोसिएशनच्या कार्यक्रमात शिरून गोंधळ घातल्याचा आरोप वकिलांनी केला. तर वकिलांनी आमच्यासोबत गैरवर्तन केल्याचे एफएसआयच्या सदस्यांचे सांगणे आहे. झटापटीच्या स्थितीत हस्तक्षेप करत पोलिसांनी स्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. या झटापटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या घटनेवरून विरोधी पक्षांनी माकपवर निशाणा साधला आहे.
माकपशी संबंधित विद्यार्थी संघटनेवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन यांनी केली आहे. तसेच माकपने एफएसआयला राजकीय संरक्षण देणे बंद करावे असेही त्यांनी म्हटले आहे.