म्हसवडमध्ये दोन वाळू तस्करांमध्ये राडा
म्हसवड :
म्हसवड येथील माणगंगा नदी पात्रातील वाळू परवानगी न घेता वाळू तस्कर व किरकोळ वाळू चोरटे राजरोसपणे बेकायदेशीर रात्रंदिवस मशनरीच्या मदतीने वाळूचा उपसा करत आहेत. तसेच ही वाळू बाहेरील जिह्यात विकली जात आहे. या विकलेल्या वाळूचे लाखो रुपये मागूनही एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेला पैलवान देत नसल्याने म्हसवड बसस्थानका समोरच म्हसवड येथील वाळूचे ठेकेदार यांनी यथेच्छ धुलाई करत रस्त्यावर खाली पाडून मारहाण केली. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या या मारहाणीत पैलवान जखमी झाला असून त्याला जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. सुमारे 72 तासाहून अधिक वेळ होवूनही या घटनेची तक्रार म्हसवड पोलिसांत झाली नव्हती.
याबाबत अधिक माहिती अशी, म्हसवड पंचक्रोशीतील माणगंगा नदीमधील वाळू म्हणजे सोन्याचे अंडे. या काळ्या सोन्यासाठी माणगंगा नदी पात्रात वाळू चोरटे रात्रीचा दिवस करत आहेत. जेसीबीच्या मदतीने रात्रोरात हजारो ब्रास वाळू डंपर, हायवा, ट्रॅक्टरच्या मार्फत चोरून नेहली जात आहे. महसूलच्या तहसीलदार, प्रांताधिकारी, तलाठी, सर्कल, पोलीस अधिकारी, पोलीस यांच्याबरोबर बैठका करून मी किती सोज्वळ, सज्जन आहे असे दाखवत पांढऱ्या कपड्यातील राजकारणी यामध्ये माहिर आहेत. महसूल व पोलिसांचा वरदहस्त लाभल्यामुळे बेसुमार उपसा करत आहेत. याबाबत अनेकवेळा म्हसवडकरांनी काळ्या सोन्याची लूट थांबवा अशी मागणी केली परंतु आजवर ना महसूल विभाग ना पोलीस ही लूट रोखू शकले नाहीत. बऱ्याच वेळा राडे, कारवाया झाल्या परंतु काही दिवसांत त्या रफादफा होवून पुन्हा वाळू तस्करीचे प्रकार सुरू आहेत.
गुरुवारी रात्री म्हसवड बसस्थानकाजवळ असाच राडा दिवडच्या एक जबाबदार पदाधिकारी असलेल्या वाळू चोरट्याला रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसवड येथील वाळू चोरट्यांनी धो धो धुलाई केली. मात्र दिवडचा गडी एकटा असतानाही म्हसवडच्या चौकातील तिघांना दिवडचा पैलवान गडी भारी पडत होता. अखेर कोणी तरी पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत पैलवानाचा म्हसवड येथील एक माजी पदाधिकारी मित्र धाऊन जात ही धुमचक्री थांबवत पैलवानाचा उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. म्हसवड पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. मात्र ज्या बसस्थानकानजिक मारामारी झाली त्याठिकाणी मात्र दगडे, फुटलेले कळकाचे बांबू, काट्या पोलिसांनी बघून पोलिसी तपास यंत्रणा कामाला लावली असली तरी या घटनेची याठिकाणी वाळू चोरट्यांची धुमश्चक्री पाहणारे मजेशीर किस्से म्हसवडच्या चौकाचौकात एकमेकांना सांगत होते. गुरुवारी रात्री व शुक्रवारी दिवसभर या दोन गटातील वाळू चोरट्यांच्या मारामारीची नोंद झाली नव्हती कि दाखल करण्यास कोणीच पुढे गेले नाही ?