धुमाळवाडीत पाण्याच्या कारणावरून दोन गटात राडा
इस्लामपूर :
धुमाळवाडी येथे पाण्याचा व्हॉल्व्ह फिरवल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. यामध्ये दोन्ही गटाचे सहाजण जखमी झाले. परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला असून दोन्हीकडील १६ आरोपी आहेत. ही घटना सोमवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली.
याबाबत कल्पना आत्माराम धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे आहे की, बाबासो जगन्नाथ धुमाळ, आदेश बाबासो धुमाळ, आदित्य बाबासो धुमाळ, नारायण आण्णा धुमाळ, हंबीरराय नारायण घुमाळ, गुलाब धोंडीराम धुमाळ, कृष्णात हंबीरराव घुमाळ, रामा हंबीरराव धुमाळ, संदीप नारायण धुमाळ यांनी जमाव जमवून हल्ला केला. माझ्यासह मुलगा व पुतणे शेडमध्ये असताना संशयित आरोपींनी कुऱ्हाड व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात मी आणि अजित दिलीप धुमाळ, आदित्य आत्माराम धुमाळ, अमित आनंदा धुमाळ असे जखमी झालो. दरम्यान मारहाणीचा जाब विचारण्यास गेल्यावर पती आत्माराम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली.
दरम्यान धनश्री बाबासो धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आदित्य धुमाळ, श्वेता धुमाळ, जयश्री धुमाळ, अजित धुमाळ अमित धुमाळ, कल्पना धुमाळ, आत्माराम धुमाळ, अमित धुमाळ यांनी आरडा-ओरडा करीत दहशत माजवली. त्यांनी मला व अतिष धुमाळ यास मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.