आष्ट्यात दोन गटात मारामारी, पाचजण जखमी
आष्टा :
पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात कटर, चाकू हत्याराने झालेल्या हाणामारीत पाच जण जखमी झाले. आष्टा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पराविरोधी फिर्यादी दिल्या असून सहाजणांवर गुन्हा दाखल आहे.
सुरज घस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निलेश शहाजी चोपडे, शहाजी नामदेव चोपडे दोघे राहणार डांगे कॉलेजजवळ आष्टा यांच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे. तर निलेश चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश संजय लोखंडे, आदित्य प्रकाश घस्ते, ओंकार प्रकाश घस्ते, सुरज नंदकुमार घस्ते, सर्व रा. डांगे कॉलेजजवळ आष्टा यांच्यावरती गुन्हा नोंद झाला आहे.
सुरज घस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डांगे कॉलेज जवळील पी एल घस्ते यांचे किराणा दुकानासमोर सुरज घस्ते हे संबंधितांना समजावून सांगत असताना निलेश चोपडे आणि शहाजी चोपडे दोन्ही गटात वाद झाला. यावेळी सुरज याचा चुलत भाऊ आदित्य हा तेथे आला असता त्यास निलेश याने त्याच्या हातातील कटरने डाव्या भुवई, गाल आणि जबड्यावर मारून त्यास जखमी केले.
शहाजी यांनी त्यांच्या हातातील चाकूने सुरज याच्या पाठीच्या डाव्या बाजूस चाकूने वार केला. तसेच छातीवर वार करून जखमी केले. तर निलेश चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पी एल घस्ते यांच्या किराणा दुकानासमोर गणेश लोखंडे, आदित्य घस्ते, ओंकार घस्ते, सुरज घस्ते यांनी बोलावून घेऊन पूर्वीच्या वादाच्या कारणावरून आदित्य याने निलेश याला याला धरून ठेवले तर इतरांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. आदित्य याने सुरज याला चाकूने मारून जखमी केले. फिर्यादीचे आई-वडील चुलते अरुण चोपडे हे फिर्यादीस वाचवण्यास आले असता त्यांनाही वरील लोकांनी मारहाण केली. या घटनेचा अधिक तपास आष्टा पोलीस करीत आहेत.