शिरोळच्या तहसील कार्यालयामध्ये मंडल अधिकारी व तलाठी यांच्यात हाणामारी
शिरोळ प्रतिनिधी
शिरटीचे(ता शिरोळ) तलाठी पी.टी.धोंड व शिरोळचे मंडल अधिकारी अविनाश सुर्यवंशी यांच्यात वारसा नोंदीच्या कारणावरुन वादावादी झाली. हा प्रकार शिरोळ तहसील कार्यालयात शुक्रवारी घडला. मंडल अधिकाऱ्याने आपल्याला कानशिलात लावल्याचा आरोप तलाठ्याने तर मंडल अधिकाऱ्याने असा कोणताही प्रकार झालेला नसून फक्त वादावादी झाली असल्याचे सांगितले.
दरम्यान तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोशी व्यक्तीवर प्रशासकीय कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले मंडल अधिकारी व तलाठी यांच्यात झालेल्या वादावादीमुळे तहसील कार्यालयामध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण बनले होते.
मंडल अधिकारी सुर्यवंशी यांनी शुक्रवारी सकाळी आपल्याला तहसील कार्यालयात बोलावून घेतले होते. नोंदीबाबत विचारणा केल्यानंतर आपण कोणतीही नोंद शिल्लक नसल्याचे सांगितले. याचा राग त्यांना आला. माझी कॉलर धरुन कानशिलात लगावली. याबाबतची चर्चा कोठे केल्यास तुझी नोकरी घालवीन असा दमही मंडल अधिकारी सुर्यवंशी यांनी दिल्याचे तलाठी धोंड यांनी सांगितले.
पक्षकाराकडून वारसा नोंदीबाबत माझ्याकडे तगादा सुरु झाल्याने तलाठी धोंड यांना शिरोळच्या तहसील कार्यालयात बोलावून घेतले होते. याठिकाणी पक्षकारही उपस्थित होते. त्यांच्यासमोर नोंदीबाबतचा उलघडा झाल्यानंतर धोंड यांची चुक दिसून आली. चुक अंगलट आल्यामुळे मारहाण केल्याचा चुकीचा आरोप धोंड करीत असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले.