पंजाबमध्ये शेतकरी-पोलिसांदरम्यान झटापट
झटापटीत 8 शेतकरी जखमी : महामार्गासाठी भूमी अधिग्रहणाला होतोय विरोध
वृत्तसंस्था/ गुरदासपूर
पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील श्रीहरगोविंदपूर साहिबनजीकच्या नंगलझोर गावात शेतकरी अन् पोलीस-प्रशासन आमने-सामने आले. यादरम्यान झालेल्या झटापटीत 8 शेतकरी जखमी झाले आहेत. या झटापटीदरम्यान शेतकऱ्यांनी राज्य सरकार तसेच पंजाब पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
श्रीहरगोविंदपूर साहिबमधून जाणाऱ्या महामार्गाकरता सरकार भूमी अधिग्रहण करु पाहत आहे, तर शेतकरी नेते या भूमी अधिग्रहणाला विरोध दर्शवत आहेत. याच मुद्द्यावरून शेतकरी अन् पोलीस यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली. द्रुतगती महामार्ग निर्माण करण्याच्या नावाखाली आमच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात असून योग्य भरपाई देखील मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
जमिनीचे अधिग्रहण करण्यापूर्वी कुठलीच कल्पना दिली जात नसून याप्रकरणी आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तर गुरदासपूर येथील घटनेमुळे शेतकरी आणि राज्य सरकारमधील तणाव अधिकच वाढला आहे. सरकार आमचे म्हणणे ऐकून घेत असून भूमी अधिग्रहण कायद्यांचे योग्यप्रकारे पालन होत नाही. आम्हाला योग्य भरपाई मिळत नाही तर दुसरीकडे आमच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतले जात असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
विकासकामांसाठी भूमी अधिग्रहण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना योग्य भरपाई दिली जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकार आणि शेतकऱ्यांदरम्यान झालेल्या चर्चेत कुठलाच मार्ग निघाला नाही. जमीन अधिग्रहणापूर्वी शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था केली जावी. तसेच शेती वाचविण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावी असे आंदोलक शेतकऱ्यांचे सांगणे आहे.
5 मार्च रोजी चंदीगडमध्ये देखील पोलीस अन् शेतकऱ्यांदरम्यान झटापट झाली होती. तेव्हा शेतकरी राज्यातील भगवंत मान सरकारच्या विरोधात निदर्शने करत होते. पूर्ण राज्यातून शेतकरी चंदीगडच्या दिशेने रवाना झाले होते. परंतु पोलिसांनी शेतकरी नेत्यांना ताब्यात घेत शेतकऱ्यांच्या जमावाला वाटेतच रोखले होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यांवर ठाण मांडून आंदोलन केले होते. तर दुसरीकडे आंदोलनाला परवानगी नसल्याचे राज्य सरकारने म्हटले होते.