‘सीजेपी’चे ‘एक्स’ खाते ब्लॉकच राहणार
दिल्ली उच्च न्यायालयाची सरकारसह ‘एक्स’ला नोटीस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि एक्स यांना नोटीस बजावली आहे. दिपके यांनी ‘सीजेपी’चे एक्स खाते ब्लॉक करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तूर्तास तरी खाते पुन्हा सुरू करण्याचा अंतरिम आदेश देण्यास नकार दिला. याप्रकरणी निर्णय घेण्यापूर्वी सरकारची बाजू ऐकणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. केंद्र सरकारने इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ‘सीजेपी’चे ‘एक्स’ खाते ब्लॉक केले आहे.
या प्रकरणाच्या दूरगामी परिणामांची व्याप्ती मोठी असल्याने सरकारची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश दिला जाऊ शकत नाही, असे न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. न्यायालयाने केंद्र सरकारला चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले असून पुढील सुनावणी 6 जुलै रोजी निश्चित केली आहे. कॉक्रोच जनता पार्टी हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असून भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अलीकडील ‘झुरळ’ या टिप्पणीनंतर उदयास आला आहे.