शहरातील अग्निशमन यंत्रणा होणार हायटेक
कोल्हापूर / संतोष पाटील :
कोल्हापूर शहरात वाढती लोकसंख्या, औद्योगिक विकास आणि शहरीकरणामुळे अग्निशमन यंत्रणेची गरज आणि महत्त्व वाढले आहे.या पार्श्वभूमीवर, महापालिकेने अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी बी.ए. सेट कंप्रेसर, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा, आणि रेस्क्यू टूल्स यांसारख्या अद्ययावत उपकरणांच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये यासाठी ठोस तरतूद केली आहे.
दहा वर्षापूर्वी मंत्रालय जळीत प्रकरणानंतर राज्यातील सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे फायर ऑडीट करण्याचे आदेश निघाले. यानंतर नव्या व जुन्या इमारतींसाठी फायर ऑडीट सक्तीचे झाले. महिना दोन महिने यंत्रणेने कागदी घोडी नाचवली गेली अन् फायर ऑडीट कागदावरच रहिले. दरम्यान, 2009 साली चेन्नई हॉस्पिटल आग, 2017 मध्ये इंदू मिल जलप्रलयानंतर खासगी बहुमजली आणि व्यवसायिक इमारतींसाठी फायर ऑडीटची नियमावली आली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी शिवाजी चौकातील अग्नितांडवात पाच दुकाने जळून खाक झाल्यानंतर यंत्रणेतील त्रृटी समोर आल्या. रहदारीच्या रस्त्यातून अग्निशमन वाहन जाताना होणारी कसरत,प् ार्यायी यंत्रणेअभावी आग विझवण्यासाठी पाणी आणण्यासाठी मुख्य वाहनांची पळापळ, फायरकडे मणुष्यबळाचा तुटवडा, गर्दी- दाटीवाटी रस्ते, वाहतुकीची कोंडी, आपत्तकालीन सामना करण्यासाठी नागरिकांचं अज्ञान, आदी विषय या अग्निप्रलयाने ऐरणीवर आले.
शहरातील गर्दीच्या रस्त्यावर अग्निशमन वाहन, अॅम्बुलन्स यांचा प्रवास सहज होत नाही. मुख्य अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यासाठी पाणी पोहच करणारी दुसरी वाहनाची सोय करावी लागते. यात मोठा वेळ निघून मोठी हानी संभवते. वाहतुकीच्या कोंडीमुळे आग विझवणे हे यंत्रणेसाठी अग्निदिव्य ठरत आहे. नवी जुनी कोणतीही इमारती असो त्यामध्ये स्वत:ची आग प्रतिबंधक यंत्रणा असावी,असा नियम सांगतो. यासाठीची अत्यावश्यक सेवा पुरविण्याची संपूर्ण जबादारी असूनही महापालिकेची आहे. नॅशनल बिल्डींग कोड (भारताची राष्ट्रीय बांधकमा संहिता) नुसार शहरातील 15 मिटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे बंधनकारक आहे. बहुतांश बहुमजली इमारतींच्या अग्निप्रलया वेळी लागणारी टर्नटेबल लॅडर महापालिकेकडे आली असली तरी तिचा प्रभावी वापर महत्वाचा आहे.
दरम्यान, 20 डिसेंबर 2012 पासून शहरात अकरा मजल्यापर्यंत (35मिटर) उंच इमारतींना परवानगी मिळाली. आता तर डी क्लासमुळे 50 मिटरपर्यंत उंच इमारत बांधता येणे शक्य झाले. 2013 पासून आजपर्यंत शहरात 100 हून अधिक बहूमजली गृहप्रकल्प आकाराला आले. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महापालिका किंवा नगरपालिकेने शहरातील इमारतींची अग्निशमनापासून बचाव करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी यासाठी बांधकाम परवानगी किंवा मिळकत करातून कर रुपाने आकारणी केली जाते. गेल्या बारा-पंधरा वर्षात वाढलेल्या शहरीकरणामुळे बहूमजली इमारतींची संख्या वाढली आहे. मात्र, मनपाची अग्निशमन यंत्रणा तुलनेत जुनीच आहे. काही महिन्यांपूर्वी 15 मिटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतीची आग विझविण्यासाठी आवश्यक असलेली टर्नटेबल लॅडर व इतर यंत्रणा मनपाने उभी केली. मात्र, शहरातील रस्त्यांची अवस्था आणि वाहतूकीची कोंडी, उपलब्ध सोय पाहता ही लॅडर आपत्तकालीन स्थितीत पोहचणार कधी हा प्रश्न आहे
- अग्निशमन यंत्रणा
कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे सध्या शहरात अनेक अग्निशमन केंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये ताराराणी अग्निशमन केंद्र (कावळा नाका), कै. बी.एस.जाधव फायर स्टेशन (मुख्य कार्यालय), कै.डी.के. खामकर फायर स्टेशन (बावडा), फुलेवाडी अग्निशमन केंद्र आणि प्रतिभानगर अग्निशमन केंद्र (राजारामपुरी) यांचा समावेश आहे. ही केंद्रे शहराच्या विविध भागांतून तत्काळ सेवा देण्यासाठी उभारली. अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणेबरोबरच कर्मच्रायांना प्रशिक्षण देण्यावरही भर दिला पाहिजे. या नवीन उपकरणांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण सत्रे आयोजित करावी लागतील.भविष्यात आणखी अग्निशमन केंद्रे उभारणे आणि वाहनांचे आधुनिकीकरण करणे यासारख्या योजना आखण्याची गरज आहे.
- अद्ययावत उपकरणांची खरेदी
महापालिकेने अग्निशमन यंत्रणेची क्षमता वाढवण्यासाठी नुकतीच अत्याधुनिक उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खालील उपकरणांचा समावेश आहे.
1 बी.ए. सेट कंप्रेसर : हे उपकरण अग्निशमन कर्मचाऱ्यांना आगीच्या ठिकाणी धुरामुळे होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या त्रासापासून संरक्षण देते. बी.ए. सेटमध्ये ऑक्सिजन सिलिंडर आणि मास्क असतात,ज्यामुळे कर्मचारी धोकादायक वातावरणातही सुरक्षितपणे कार्य करू शकतात. कंप्रेसर या सिलिंडरांना पुन्हा भरून वापरण्यासाठी उपयुक्त ठरते. कोल्हापूरसारख्या औद्योगिक आणि दाट लोकवस्तीच्या भागात हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
2 व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा : हा कॅमेरा आपत्तीग्रस्त ठिकाणी अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी वापरला जातो. धूर,अंधार किंवा ढिगाऱ्यांमध्येही हा कॅमेरा प्रभावीपणे कार्य करतो आणि थर्मल इमेजिंग तंत्रज्ञानाद्वारे व्यक्तींची अचूक लोकेशन शोधतो. यामुळे बचाव कार्य जलद आणि सुरक्षित होण्यास मदत होते.
3 रेस्क्यू टूल्स : यामध्ये हायड्रॉलिक कटर, स्प्रेडर आणि इतर अत्याधुनिक साधने येतात, जी वाहन अपघात, इमारतींचे ढिगारे किंवा इतर आपत्तींमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी वापरली जातात.ही साधने मजबूत धातू कापण्यापासून ते अवजड वस्तू उचलण्यापर्यंत अनेक कामांसाठी उपयुक्त आहेत. या उपकरणांच्या खरेदीमुळे कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा केवळ आग विझवण्यापुरती मर्यादित न राहता, आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यातही अग्रेसर होईल, अशी आशा आहे.
- आधुनिकीकरण गरजेचं ...!
शहरात गेल्या काही वर्षांत औद्योगिक वाढ झपाट्याने झाली आहे. याशिवाय, दाट लोकवस्ती, बाजारपेठा आणि ऐतिहासिक वास्तू यामुळे आग आणि इतर आपत्तींचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक अग्निशमन उपकरणे अपुरी पडू शकतात. नवीन उपकरणे खरेदीमुळे अग्निशमन कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास सक्षम करण्यास मदत होईल. आपत्तीच्या वेळी तत्काळ आणि प्रभावी बचाव कार्य करता येईल. जागतिक दर्जाच्या अग्निशमन सेवेसोबत स्पर्धा करण्यासाठी यंत्रणेचे आधुनिकीकरण महत्वाचे आहे.