For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराला वळीव पावसाने झोडपले

04:12 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
शहराला वळीव पावसाने झोडपले
Advertisement

कांदा मार्केट, भेंडीबाजार, पी. बी. रोड, येडियुराप्पा रोड येथे साचले पाणी : झाडे कोसळून नुकसान

Advertisement

बेळगाव : कडाक्याच्या उकाड्यानंतर मंगळवारी दुपारनंतर वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी झाडे तसेच विद्युत खांब कोसळले. मुख्य बाजारपेठेसह पी. बी. रोड, येडियुराप्पा रोडवर गुडघाभर पाणी साचले होते. तासभर झालेल्या या पावसाने शहरात सर्वत्र दाणादाण उडविली.

महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर शहरात पुन्हा एकदा पाऊस दाखल झाला. मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याच्या तडाख्मयामुळे पावसाची प्रतीक्षा पाहिली जात होती.  असह्या होत असलेल्या उन्हाच्या चटक्याने शहरवासीय होरपळून निघत होते. मंगळवारी सकाळपासून कडाक्याचे ऊन होते. परंतु ढगाळ वातावरणही दिसून येत होते. दुपारी 4 नंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत जोरदार पाऊस दाखल झाला.

Advertisement

सखल भागात पाणी शिरले

अचानक दाखल झालेल्या पावसाने शहरांसह उपनगराला झोडपले. तब्बल तासभर पावसाची संततधार सुरूच राहिल्याने सखल भागात पाणी साचले. कांदा मार्केट, रविवार पेठ, भेंडीबाजार कॉर्नर, गणपत गल्ली कॉर्नर या परिसरात पाणी साचले. येडियुराप्पा रस्त्यावर तब्बल गुडघाभर पाणी साचल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती. सायंकाळी 6 नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने सखल भागातील पाणीही ओसरले. परंतु महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचे दृश्य पुन्हा एकदा समोर आले.

कांदा मार्केट- पी. बी. रोड येथे शिरले पाणी

महानगरपालिकेकडून रविवार पेठ, कांदा मार्केट, भातकांडे गल्ली या परिसरात गटारी स्वच्छ केल्या नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास जागाच उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे सर्व पाणी कांदा मार्केट येथील भाजीपाला विक्री होणाऱ्या परिसरात साचून राहिले. जोरदार पावसामुळे काही भाजीपाला पावसासोबत वाहूनही गेला. काही दुकानांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने मालाचे नुकसान झाले. मंगळवार असल्याने दुकाने बंद होती. त्यामुळे बुधवारी सकाळी ती उघडल्यानंतर साहित्याचे किती नुकसान झाले हे समोर येणार आहे. उतारावरून सर्व पाणी कांदा मार्केट येथे येऊन साचत असल्याने तातडीने यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. त्याचबरोबर पी. बी. रोड येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तेथे देखील दुकानांमध्ये पाणी शिरले.

भेंडीबाजारात गुडघाभर पाणी

पांगुळ गल्ली-भेंडीबाजार कॉर्नर येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. तब्बल गुडघाभर पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागली. सखल भागात असलेल्या काही कापड दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापारी वैतागले होते. या ठिकाणी सतत पाणी साचत असल्याने व्यवसाय करणे अवघड होत असल्याने महापालिकेने यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.

शहरासह तालुक्यात विजेचा खेळखंडोबा

मंगळवारी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या धुवाधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी फांद्या कोसळल्याने विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले. यामध्ये विद्युत खांब, ट्रान्स्फार्मर यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शहराच्या बऱ्याचशा भागात सायंकाळपर्यंत विजेचा लपंडाव सुरू होता. हेस्कॉम कर्मचाऱ्यांकडून पाऊस कमी झाल्यानंतर दुरुस्तीचे काम करण्यात आले.

Advertisement
Tags :

.