शहराला धूलिवंदनाचे वेध
बाजारपेठेत रंग, मुखवटे, टिमक्या दाखल
बेळगाव : शहर आणि उपनगरात गुरुवार दि. 13 रोजी होळी सण साजरा होणार असून शुक्रवार दि. 14 रोजी धूलिवंदनाची धुम असणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत आकर्षक मुखवटे, रंग आणि टिमक्या, ढोलकी दाखल झाले आहेत. सर्वांनी एकत्र येऊन वाईट प्रतिकात्मक होळी करूया, असे आवाहन केले जात असून पाण्याचा कमी वापर व्हावा, यासाठी कोरड्या रंगांचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. होळी हा आनंदाचा, उत्साहाचा, रंगांचा सण असून कामण्णा मूर्तीला नैवेद्य अर्पण करून होळी पेटविण्यात येते. काही मंडळांतर्फे सार्वजनिक होळी पेटविण्यासाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे. गोवऱ्या, टिमक्या तसेच पूजा साहित्याची लगबग सुरू होते. फाल्गुन पौर्णिमेच्या मुहूर्तावर होळी सणानंतर दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा होतो. होळीच्या पूर्वसंध्येला मंडप घालणे, लाकूड आणण्याची लगबग सुरू होते. सध्या सर्वांनाच होळीचे वेध लागल्याने लहान मुले, टिमक्या, ढोल वाजवून लक्ष वेधून घेत आहेत. बाजारपेठेत रंग, पिचकाऱ्या, मुखवटे खरेदीसाठी गर्दी होत आहे. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. त्यामुळे हरभरा डाळ, मूग तसेच नारळ खरेदी होताना दिसत आहे.
पांगुळ गल्लीत सामूहिक लोटांगण कार्यक्रम
शुक्रवार दि. 14 रोजी शहरात रंगोत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळणार आहे. पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरासमोर सामूहिक लोटांगण घालण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर अन्य ठिकाणीदेखील रंगोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.