शहरातील स्मशानभूमींचा होणार विकास
बांधकाम स्थायी समिती बैठकीत निर्णय : दर शनिवारी स्मशानभूमींची स्वच्छता केली जाणार
बेळगाव : सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीसह शहरातील विविध स्मशानभूमींचा विकास आणि स्वच्छतेवरून मंगळवार दि. 7 रोजीच्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. तसेच यापुढे दर शनिवारी स्मशानभूमींची स्वच्छता केली जाणार आहे. मंगळवार दि. 7 रोजी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात बांधकाम स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष जयतीर्थ सौंदत्ती होते. यावेळी कौन्सिल सेक्रेटरी गीता कौलगी यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्यासह बैठकीपुढील विषय सांगितले. यावेळी विविध कामांना चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
विशेष करून शहरातील सदाशिवनगर आणि शहापूर स्मशानभूमीसह इतर स्मशानभूमीच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून सदाशिवनगर स्मशानभूमीचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे सदर काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना सदस्यांनी केली. त्याचबरोबर शहापूर स्मशानभूमीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. कोणत्याही स्मशानभूमीच्या विकासकामात भेदभाव न करता विकासकामे आणि स्वच्छता करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना करण्यात आली. सदाशिवनगर स्मशानभूमीचे काम वर्षभरापासून रेंगाळले आहे.
सदर काम रेंगाळण्यामागचे कारण काय? अशी विचारणा सदस्यांनी केली. त्यावर निधी अपुरा पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मनपाच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी तातडीने आराखडा तयार करून तो सादर करावा, अशी सूचना केली. सदाशिवनगर स्मशानभूमीचे काम ज्याप्रमाणे रेंगाळत करण्यात आले. तशाप्रकारे शहापूर स्मशानभूमीचे काम केले जाऊ नये. अधिकारी केवळ बैठकीत ‘हो’ चा सूर देतात. पण प्रत्यक्षात काहीच कामे होताना दिसत नाहीत, असा आरोप सदस्यांनी केला.
अनेक स्मशानभूमींमध्ये कचरा पडून असल्याने स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोपही सदस्यांनी केला. तसेच दरशनिवारी सर्व स्मशानभूमींची स्वच्छता करण्याचे यापूर्वी ठरले होते. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सफाई कर्मचाऱ्यांना कचऱ्याचे वर्गीकरणाचे काम करावे लागत असल्याने स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण यापुढे आठवड्यातील दर शनिवारी स्मशानभूमींची स्वच्छता केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बैठकीला बांधकाम स्थायी समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
शहापूर स्मशानभूमीच्या कामाला आजपासून सुरुवात
शहापूर स्मशानभूमीचे काम कधी सुरू करणार, अशी विचारणा सदस्यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावर बुधवार दि. 8 रोजीपासून कामाला सुरुवात केली जाईल, असे उत्तर अधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. सदाशिवनगर स्मशानभूमीत आराखड्यानुसार काम करणे जरुरीचे होते. पण विनाकारण आराखड्यात तरतूद नसतानाही स्मशानभूमीतील इतर साहित्य हटविण्यात आल्याने लोकांची गैरसोय होत आहे. अशा प्रकारची पुनरावृत्ती शहापूर स्मशानभूमीत होता कामा नये, अशी सूचना यावेळी सदस्यांनी अधिकाऱ्यांना केली.