चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या खोदाईमुळे नागरिक त्रस्त
हट्टीहोळ गल्लीत दोन्ही बाजूने खोदाई, ये-जा करणे कठीण
बेळगाव : शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी घालण्यात येणाऱ्या जलवाहिनींचे काम स्थानिक नागरिकांना डोकेदुखी ठरू लागले आहे. हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथे घराच्यासमोर गल्लीत आणि परसात देखील खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना ये-जा करणेही कठीण झाले आहे. आधीच अर्धवट कामांनी स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच गल्लीत समोर आणि पाठीमागे देखील खोदाई करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी एलअँडटीकडून प्रयत्न सुरू आहेत. 2025 पर्यंत शहरात सर्वत्र 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट एलअँडटीने ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात चौदा ठिकाणी जलकुंभही उभारण्यात आले आहेत. सद्यस्थितीत आर. सी. नगर, मुत्यानट्टी, शहापूर आणि इतर भागात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनींचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत आर. सी. नगर आणि मुत्यानट्टी येथे प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबरोबर शहरातील इतर भागातही खोदाईचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, ही खोदाई स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरू लागली आहे.
खोदाई केलेले खड्डे त्वरित बुजवा
शहरातील अरुंद रस्त्यांवर खोदाई करण्यात आली आहे. मात्र, तातडीने जलवाहिनी घालून बुजविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अर्धवट कामांचा नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. दरम्यान, या खोदाईमुळे जलवाहिन्या गळतीचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ लागला आहे. खोदाई केलेल्या चरी तातडीने बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही होत आहे.