दर तीन महिन्यांनी रक्तासह अन्य तपासण्या नागरिकांनी करून घ्याव्यात - संदेश निकम
जबरदस्त कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे मोफत आरोग्य शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद
वेंगुर्ले (वार्ताहर)-
राऊळवाडा येथील जबरदस्त कला, क्रीडा सांस्कृतिक मंडळ वेंगुर्ले असूनही जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध आजाराचे तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांना निमंत्रीत करून सर्व प्रकारच्या आजारांची तपासणी, उपचार व ऑपरेशन कॅम्प भरवून नागरीकांना आजारमुक्त करण्याचे समाजपयोगी काम करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात या मंडळाबाबत गौरवोदगार काढले जातात. त्यांच्या आयोजनात कोल्हापूरच्या अथायु हॉस्पीटलने तसेच उपजिल्हा रूग्णालय वेंगुर्ले ने सुध्दा चांगले सहकार्य दिले आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्याला आजार असो वा नसो दर तिन महिन्यांनी शासनाच्या उपजिल्हा रूग्णालयातून रक्त, इसीजी, एक्सरे यांची तपासणी करून घ्यावी. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून सर्व तपासण्या या मोफत होतात. त्यामुळे प्रत्येकाने करून घ्याव्यात. असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी मोफत आरोग्य शिबीराच्या उदघाटन प्रसंगी केले.
राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ व अथायु हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालय येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबीराचे उदघाटन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत वेंगुर्ले उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डॉ. संदिप सावंत, अथायु हॉस्पीटल कोल्हापुर मधील अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. विशाल पाटील, अथायु हॉस्पीटलचे मॅनेजर मदन गोरे, जनसंपर्क अधिकारी वैभव काटकर, सारथी संदिप चौगुले, जबरदस्त मंडळाचे अध्यक्ष बाबाजी राऊळ ठाकरे सेनेचे उपशहर प्रमुख रँक्स परेरा, मंडळाचे संस्थापक सदस्य अजित राऊळ आदींचा समावेश होता.या मोफत आरोग्य तपासणी व ऑपरेशन शिबिरामध्ये मोफत हृदयविकार, अँजिओग्राफी, पित्ताशयात खडे, मुतखडा, प्रोस्टेट, कॅन्सर, केमोथेरपी, व्हेरिकोज व्हेन्स, मणका तपासणी करण्यात आली.
यावेळी अथायु हास्पीटलचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. विशाल पाटील यांनी, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अँजिओप्लास्टी, बायपास, हृदयाचे व्हॉल्व बदलणे, दुर्बिणीद्वारे मुतखडा, प्रोस्टेट, दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचे खडे, हाडाचे फॅक्चर, सर्व प्रकारचे कॅन्सर, डायलेसीस, लेसरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स हे उपचार सर्व रेशन कार्ड व आधार कार्डधारकांना मोफत ऑपरेशन करण्यात येतात. तसेच शिबिरादिवशी ईसीजी, रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात येते. प्रत्येक नागरीकांनी कामातील थोडा वेळ काढून मोफत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे आपले शरीर आजारमुक्त ठेवू शकतो. असे स्पष्ट केले.
सदर आरोग्य तपासणी शिबिराचा 115 रुग्णांनी लाभ घेतला या शिबिरात 6 जणांची मोफत ऑपरेशन साठी निवड करण्यात आली. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी जबरदस्त मंडळाचे सचिव सिध्देश रेडकर, खजिनदार स्वप्नील पालकर, सदस्य विवेक राऊळ, अजित राऊळ, अद्वैत आंदुर्लेकर, बापू वेंगुर्लेकर, कौशल मुळीक, अनंत रेडकर, रोहित रेडकर, अशोक कोलगांवकर, तुषार भाटकर, हितेश सावंत, नारायण आंदुर्लेकर, संकेत राऊळ, प्रांजल वेंगुर्लेकर, शिवानी राऊळ आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभाराचे काम अजित राऊळ यांनी केले.