नागरिकांनी हस्तकला वस्तू विकत घ्याव्यात
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : आदिवासी हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन
पणजी : हस्तकला उत्पादने पर्यावरणाचा समतोल राखण्यास उपयुक्त ठरतात. तसेच या उत्पादनाना विकत घेण्यास प्रधान्य दिल्यास स्थानिक कारागिरांचा फायदा होतो. त्यामुळे सामान्य लोकांसह खाजगी कंपन्या, उद्योग क्षेत्राने हस्तकला उत्पादने विकत घ्यावी आणि स्थानिक कारागिरांना सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. सरकारने कुणबी साडी, शाल यांच्यासह अन्य हस्तकला उत्पादनांना प्राधान्य दिले आहे. राज्यात कोणीही सरकारी पाहुणे आल्यास त्यांना कुणबी साडी, शाल भेट म्हणून दिली जाते. त्यामुळे आता कुणबी कला देशभर पोहोचली आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. कला अकादमी येथे ‘आदिवासी हस्तकला’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. यावेळी मंत्री रमेश तवडकर, कला अकादमीचे अध्यक्ष बाबु कवळेकर, खात्याचे संचालक सगुण वेळीप व अन्य अधिकारी उपस्थित होते.
स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी आम्ही गरजूंना कौशल्य प्रशिक्षण देत आहोत. ग्रामीण भागातील उद्योजकांना चालना मिळावी यासाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानिक हस्तकला टिकून राहावी यासाठी आता खाजगी क्षेत्राने पुढाकार घेणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य सरकार हस्तकला कारागिरांना प्राधान्य देत आहे. कारागिरांना प्रशिक्षण देणे, आधुनिक उपकरणे देणे, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदी कामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत 200 हून अधिक विणकाम यंत्रे देण्यात आली आहेत. 300 प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. आतापर्यंत सरकारने 2 हजारहून अधिक हस्तकला कारागिरांना मदत केली आहे. याशिवाय बहुजन समाजातील महिला स्वयंसहाय्यता गटांना देखील आर्थिक मदत करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून आणि फीत कापून ‘ट्रायबल क्राफ्ट’ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रदर्शनाची पहाणी करून कारागिरांची स्तूती केली.