गॅस तुटवड्याबद्दल नागरिकांनी चिंता करू नये
अन्न-नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांचे आवाहन
बेंगळूर : स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्याबद्दल नागरिकांनी चिंता करू नये. हॉटेल्सना 20 टक्के स्वयंपाकाचा गॅस पुरवला जात आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी दिली. बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, रुग्णालयांना 100 टक्के स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर पुरवले जात आहेत. शहरी भागात घरगुती वापरासाठी 25 दिवसानंतर तर ग्रामीण भागात 45 दिवसानंतर एक सिलिंडर पुरवला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात व्यावसायिक गॅसची समस्या असून आम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक बैठक यापूर्वीच पार पडली आहे. परिस्थिती कशी हाताळायची यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसोबतही बैठक झाली आहे. 31 मार्च रोजी बैठकांची दुसरी फेरी होणार असून त्यात व्यावसायिक सिलेंडरच्या संकटासंदर्भात योग्य निर्णय घेतले जातील. तसेच पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरही चर्चा होईल, असे त्यांनी सांगितले.