For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटच्या रस्ता हस्तांतरणाला नागरिकांचा विरोध

06:58 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटच्या रस्ता हस्तांतरणाला नागरिकांचा विरोध
Advertisement

14 हजार 136 आक्षेपांची नोंद : पर्यायी रस्ता नसल्याने फेरविचाराची मागणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्डमधील तीन रस्त्यांचे लष्कराकडे हस्तांतरण करण्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. मागील दीड महिन्यापासून नागरिकांची सह्यांची मोहीम सुरू होती. अखेर सोमवारी 14 हजार 136 नागरिकांचे आक्षेप कॅन्टोन्मेंटकडे सोपविण्यात आले. कॅन्टोन्मेंटमधील रस्ते बंद झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने कॅन्टोन्मेंटने या प्रस्तावावर फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

कॅन्टोन्मेंटमधील रायगड गेट ते जिंजी गेट दरम्यानचा अल्बर्ट एक्का रोड, हर्षण एन्क्लेव्ह गेट ते रामघाट रोड दरम्यानचा स्मार्ट रोड, शर्कत पार्क ते क्वीन गार्डन दरम्यानचा क्वीन गार्डन रोड लष्कराला (एमईएस) देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. याला नागरिकांनी सुरुवातीपासूनच तीव्र आक्षेप घेतला होता. कॅन्टोन्मेंटने याबाबतचे आक्षेप नागरिकांकडून मागविले होते. त्यामुळे शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक, नागरिक, व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर यासह इतरांनी आपले आक्षेप कॅन्टोन्मेंटकडे नोंदविले.

रस्ते बंद करून शहराचा विकास होत नाही

कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार यांच्याकडे सह्या केलेले सर्व आक्षेप देण्यात आले. यावेळी बोलताना द बेलगाम कॅन्टोन्मेंट रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य नितीन खोत म्हणाले, यापूर्वीही दोनवेळा या रस्त्यांच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव आला होता. परंतु त्यावेळी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने प्रस्ताव मागे घेण्यात आला. परंतु आता पुन्हा एकदा हा प्रस्ताव आणून कॅन्टोन्मेंट नेमके काय साध्य करीत आहे? कोणताही रस्ता बंद करण्याचा अधिकार लष्कराला नाही. रस्ते बंद करून शहराचा विकास होत नाही. त्यामुळे हस्तांतरणाचा हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

माजी आमदार अनिल बेनके यांनीही हस्तांतरणाला आक्षेप घेत शहरात उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती दिली. सध्या कॅन्टोन्मेंट एरियामध्ये लष्कराकडून सुरक्षेच्या कारणास्तव सुरू असलेल्या प्रकारांची सीईओंना माहिती देण्यात आली. यावेळी बोलताना कॅन्टोन्मेंटचे सीईओ सुदाम मंचलवार म्हणाले, नागरिकांची बाजू लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल.

यावेळी द बेलगाम कॅन्टोन्मेंट रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष ओमर फारुक नवाब, सेक्रेटरी रंजन शेट्टी, कॅन्टोन्मेंटचे सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर, अजय पै, दिनेश शिराळकर, वीरभद्र देसाई, अॅड. नयना नेर्ली, सोनाली खोत, कॅन्टोन्मेंटचे माजी सदस्य साजिद व राहिला शेख यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.