For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | सातारा बाजार परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त

01:19 PM Mar 10, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   सातारा बाजार परिसरातील नागरिक मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त
Advertisement

                  सातारा शहरातील महत्त्वाच्या भागात सांडपाणी

Advertisement

सातारा : सदर बाजार परिसर हा सातारा शहरातील महत्त्वाचा व सर्वात मोठ्या भागांपैकी एक मानला जातो. या परिसरात अनेक शासकीय कार्यालये, शासकीय निवासस्थाने तसेच मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. मात्र या भागातील लक्ष्मी टेकडी, भीमाबाई झोपडपट्टी, वडार वस्ती आणि कसाई गल्लीतील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

सदर बाजार परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले असून नाल्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पालिकेच्या वतीने कधीकधी नाल्यांची साफसफाई केली जात असली तरी अनेक ठिकाणी ड्रेनेजवरील सिमेंटची झाकणे तुटलेली आहेत. त्यामुळे प्लास्टिक कचरा अडकून गटारे चोकअप होत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी अनेक घरांसमोरून सांडपाणी वाहताना दिसत असून परिसरात डुकरांचा वावर वाढल्याने अस्वच्छतेबरोबरच रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरात प्रभावी स्थानिक नेतृत्वाचा अभाव असल्याने या समस्यांकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नाही.

Advertisement

दरम्यान, पालिकेच्या वतीने या भागात घरकुल बांधण्याचे काम काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र है काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. "हक्काचे घर नेमके कधी मिळणार?" असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे. नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांनी निवडणुकीच्या उत्साहातून बाहेर येत नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि परिसरातील स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था तसेच घरकुल प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Advertisement
Tags :

.