नागरिकांनी घेतली खासदार शेट्टर यांची भेट
पश्चिम भागातील विविध समस्या निवारणाची मागणी
बेळगाव : तालुक्यातील रखडलेले रस्ते, शाळांच्या जीर्ण झालेल्या इमारती, मंदिरांचे अर्धवट बांधकाम, पिण्याचे पाणी यासह इतर समस्यांसाठी नुकतीच तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांनी खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेतली. तालुक्यात अनेक समस्या असून त्या त्वरित दूर करण्याची मागणी खासदार शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली खासदारांची भेट घेतली. कर्ले ते बेळवट्टी हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे मागील दहा वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. रस्त्याचा अधिकतर भाग उखडून गेला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहतूक करणे जीवघेणे ठरत आहे.
2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यावेळी कर्ले-बेळवट्टी रस्त्याचा अधिकतर भाग वाहून गेला. बैलगाडी घेऊन ये-जा करणेही मुश्कील बनले आहे. कर्ले येथील हायस्कूलची इमारत जीर्ण झाली असल्याने खासदार फंडातून निधी मंजूर करून देण्याची मागणी करण्यात आली. बेळवट्टी ते इनाम बडस रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बेळवट्टी, बडस, बाकनूर येथील नागरिकांना ये-जा करणे अवघड झाले आहे. हंगरगे येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. बेळगाव-वेंगुर्ला मार्गाची डागडुजी करावी यासह इतर मागण्या शेट्टर यांच्याकडे केल्या. खासदार जगदीश शेट्टर यांनी समस्या ऐकून घेत त्या लवकरात लवकर दूर केल्या जातील, असे आश्वासन दिले.