आंबेवाडी रस्त्यावरील धोकादायक खड्डे बुजविल्याने नागरिकांतून समाधान
हिंडलगा : आंबेवाडी येथील मार्कंडेय नदीपासून अलतगा रस्त्यापर्यंत दीड वर्षांपूर्वी करण्यात आलेला डांबरी रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत होता. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली होती. त्यामुळे दररोज छोटे-मोठे अपघात होत होते. वाहनधारकांना हे खड्डे चुकवत असताना पराकाष्टा करावी लागत होती. याकडे संबंधित खात्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी दै. ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती मिरवणुकीच्या आधी रस्ता दुरुस्त करावा, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु याची दखल संबंधित खात्याने न घेतल्याने लागलीच ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी यळगुकर व पंचायत विकास अधिकारी यांनी याची नोंद घेऊन या रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवले. आता धोका टळला आहे. रस्त्यावरील खड्डे ग्रामपंचायत मार्फत बुजवल्याने वाहनधारक, नागरिक व शिवप्रेमींतून समाधान व्यक्त केले जात आहे.