'चक्रीवादळ' विषयावर कोळंब येथे रंगीत तालीम
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
मालवण | प्रतिनिधी
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी 'चक्रीवादळ' या विषयावर कोळंब येथे रंगीत तालीमीचे आयोजन करण्यात आले होते. रंगीत तालीम कार्यक्रमात मालवणातील सर्व यंत्रणा सहभागी झाली होती. कार्यक्रम व्ही. सी. द्वारे घेतला गेला . या कार्यक्रमात चक्रीवादळ या आपत्तीच्या अनुषंगाने विविध घटना, प्रसंग उद्भवल्यास त्याला जिल्ह्यातील यंत्रणा कशा रीतीने प्रतिसाद देणार आहे. याची माहिती विविध जिल्हास्तरीय यंत्रणांकडून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी घेतला आहे. महसूल, ग्राम विकास, पोलीस, महावितरण, प्रादेशिक बंदर अधिकारी, मत्स्यव्यवसाय हे विभाग व जिल्ह्यातील इतर महत्त्वपूर्ण विभाग सहभागी झाले आहेत.
मालवण तालुक्यातील कोळंब गावातील लोकांना स्थलांतरित केले जाणार असून त्यांना सुरक्षित आश्रय स्थानाच्या ठिकाणी ठेवले गेले आहे. यासाठी मालवण तालुक्यात सुरक्षित निवारा गृहे देखील निश्चित करण्यात आलेली होती .राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि जिल्ह्याकडून तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांना स्थलांतराच्या सूचना मिळाल्यावर निवडलेल्या गावातील नागरिकांना सुरक्षित आश्रय स्थानांच्या ठिकाणी स्थलांतरित केले गेले आहे. मत्स्यव्यवसाय विभाग व प्रादेशिक बंदर अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत समुद्राच्या ठिकाणी देखील अशाप्रकारे "चक्रीवादळ' कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने काही शोध व सुटका प्रात्याक्षिके केली गेली आहेत. या रंगीत तालीमीत भारतीय तटरक्षक दल, नेव्ही, NDRF यांची पथके देखील सहभागी झाली होती. संपूर्ण कोकण विभागासाठी हा रंगीत तालीमीचा कार्यक्रम घेतला गेला.
.या कालावधीत कोणतेही चक्रीवादळ जिल्ह्यात येण्याची सद्यस्थितीत शक्यता नाही. केवळ चक्रीवादळ आल्यास त्या अनुषंगाने प्रशाकीय यंत्रणांच्या तयारीची माहिती घेणे हा याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी चक्रीवादळ अनुषंगाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या अनुषंगाने काही माहिती आवश्यक असल्यास मालवण तहसील कार्यालय (०२३६५) २५२०४५ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले. यावेळी मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे, सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, संदीप शेलटकर तसेच इतर उपस्थित होते. सर्व शासकीय विभाग अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.