सततच्या मार्गबदलाचा नागरिकांना त्रास
बेळगाव : सकाळी दहाची वेळ... कोणाला कार्यालय गाठून मस्टरवर सही करायची आहे... कोणाला बायोमेट्रीक पद्धतीने आपली वेळ नोंद करायची आहे... कोणाला तातडीने ब्लड टेस्टला जायचे आहे... कोणाला हॉस्पिटलमध्ये डबा पोहोचवायचा आहे... तर कोणाला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे आहे... परंतु प्रशासन व पोलीस खात्याला याचे गांभीर्यच नाही. काहीही होवो जोपर्यंत व्हीआयपींच्या गाड्यांचा ताफा जात नाही, तोवर कोणीही आपले वाहन पुढे दामटायचे नाही. हा पोलिसांचा फतवा आता बेळगावकरांच्या सहनशक्तीचा अंत पाहू लागला आहे.
कोणीही व्हीआयपी येणार म्हटले की, रस्ते अडवायचे. वाहनचालकांना रोखून धरायचे. कोणी अडचण सांगितली तरीही त्याबद्दल कोणतीच सहानुभूती न दाखविता त्याच्यावरच पुन्हा दामटायचे, हे प्रकार आता बेळगावकरांना नवीन नाहीत. या शहरात कधीही मार्ग रोखून धरला जातो. वाहने अडविली जातात आणि सहनशील बेळगावकर त्याविरुद्ध ब्र सुद्धा न उच्चारता पोलिसांचा आदेश म्हणून मौन बाळगतात. वास्तविक, मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्यासाठी कधीही वाहने अडवू नयेत व आपल्याला कोणीही पुष्पगुच्छ न देता वह्या द्याव्यात, अशा घोषणा केल्या होत्या. परंतु त्यांनासुद्धा याचे स्मरण आहे का नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुर्दैवाने सातत्याने पूर्वसूचना न देता मार्ग अडविले जातात. एकीकडे उड्डाण पुलाच्या डांबरीकरणानिमित्त कोणतीच पूर्वसूचना न देता रस्ता बंद केला जातो. दुसरीकडे व्हीआयपी मंडळींसाठी वाहने रोखून मार्ग अडविला जातो. त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना कोणी वाली आहे का? हा प्रश्न पडला आहे. शुक्रवारी आरसीयूच्या पदवीदान समारंभासाठी राज्यपाल बेळगावमध्ये आले होते. मात्र व्हीटीयूपासून आरसीयूपर्यंत ते पोचण्यासाठी संपूर्ण काँग्रेस रोड, खानापूर रोड आणि पुढील मार्गावरील वाहतूक अचानक वळविली. व वाहनचालकांना रोखून धरले. राज्यपालांच्या पदाची प्रतिष्ठा निश्चितच आहे. त्यांच्याबद्दल प्रत्येकांनाच आदर आहे.
ते अतिमहनीय व्यक्तींमध्ये येत असल्यामुळे त्यांचे वाहन जाताना वाहतूक कोंडी होऊ नये हे योग्यच आहे. परंतु निदान त्यांचे वाहन जाणाऱ्या मार्गावर तात्पुरता बदल केला आहे. एवढी पूर्वसूचना जरी दिली तरी नागरिक पर्यायी मार्ग स्वत:हूनच शोधतात. आणीबाणीचा प्रसंगही लक्षात न घेता तसेच डॉक्टर, पत्रकार यांच्या कामांचे स्वरुपही लक्षात न घेता सर्वांनाच रोखले जाते. निदान रुग्णांना यामधून सवलत मिळायला हवी. परंतु वाहनांची एकाच बाजूने गर्दी झाल्यानंतर रुग्णवाहिकासुद्धा पुढे जाणे अशक्य असते. इतक्या सर्व नागरिकांच्या वेळेचा अपव्यय करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.