मच्छेतील कचरा समस्येने नागरिक हैराण
बेळगाव : मच्छे, ता. बेळगाव येथे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नेहरूनगर, भैरवनाथनगर, लक्ष्मीनगर परिसरात व्यवस्थित कचऱ्याची उचल होत नसल्यामुळे दुर्गंधी वाढली असून, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मच्छे नगरपंचायतीच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहने आहेत. पण गेल्या चार महिन्यांपासून या परिसरातील कचरा उचलण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि मन:स्ताप सहन करावा लागत आहे. या कचऱ्याचा जनावरांनाही त्रास असून परिसरात रोगराई वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दुर्गंधीमुळे लहान मुलांचे आजार, प्लास्टिकमुळे जनावरांनाही धोका वाढला आहे. उकिरड्याचे स्वरुप प्राप्त झाल्यामुळे या परिसरात भटक्या कुत्र्यांचाही वावर वाढला आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन वेळेत कचरा उचलण्याची मागणी नेहरूनगर व भैरवनाथनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.