लोकाभिमुख सेवा गतीमान करणार
सांगली :
लोकायुक्त, उच्च न्यायालयाच्या स्तरावर अनेक फाईल्स पेंडीग आहेत. या पेन्डन्सीवर काम करण्याबरोबरच उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने लोकाभिमूख सेवांची गती वाढवणार असल्याची ग्वाही नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्हाधिकारी काकडे यांनी दर सोमवार आणि शुक्रवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत सामान्य नागरिकांसाठी आपल्या दालनाचे दरवाजे खुले केले आहेत. याशिवाय सर्व प्रांत आणि तहसिलदारांनाही तशा सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्ह्याच्या महसूल विभागाचा कारभार आता लोकाभिमुख होईल, असा विश्वास सांगलीकर व्यक्त करू लागले आहेत. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याला सांगली जिल्हयासाठी भरीव काम करायचे असल्याचे सांगतानाच सामान्य माणसांची कामे कुठेही थांबणार नाहीत याची दक्षता घेणार असल्याचे स्पष्ट केले. सोमवारी त्यांनी पत्रकार, संपादक यांच्याशी संवाद साधला.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभागांचा समन्वय उत्तम साधला जाईल. लोकांच्या हितासाठी ज्या शासकीय सेवा देतोय त्याची गती वाढवली जाईल. त्याचबरोबर शासनाचा शंभर दिवसांचा महत्वकांक्षी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी काकडे यांनी यावेळी सांगितले.प्रलंबीत फाईल्स ही मोठी समस्या आहे. पण येत्या काही दिवसात प्रलंबीत फाईल्स निकाली काढण्याबरोबरच झिरो पेंन्डन्सीकडे प्रत्येक कार्यालयाची वाटचाल होईल असे सांगितले. कोणत्याही कामासाठी सामान्य जनतेची अडवणूक होणार नाही याकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देणार असल्याचेही जिल्हाधिकारी काकडे यांनी यावेळी स्पष्ट केले.