सीआयएसएफ सैनिकाची आत्महत्या
वृत्तसंस्था / सुरत
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) एका सैनिकाने गुजरातमधील सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेची सविस्तर माहिती शनिवारी देण्यात आली आहे. या सैनिकाचे नाव किसन सिंग असे असून तो जयपूरचा होता. त्याने स्वत:च्या पोटात गोळ्या झाडून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याला त्वरित रुग्णालयात आणण्यात आले होते. त्याने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे नंतर घोषित करण्यात आले. 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये सीआयएसएफमध्ये आत्महत्या करण्याच्या प्रमाणात 40 टक्के घट झाली आहे, अशी माहिती नुकतीच या संस्थेचे प्रसिद्ध केली आहे. ही माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये हे आत्महत्या प्रकरण समोर आले आहे. कामाचा ताण, रजा न मिळणे, कुटुंबसौख्य न मिळणे आदी कारणे सैनिकांच्या आत्महत्यांच्या मागे आहेत, असे तज्ञांचे मत आहे. 2023 मध्ये सीआयएसएफच्या 25 सैनिकांनी आत्महत्या केली होती. तर 2024 मध्ये ही संख्या 15 होती, अशी माहिती या संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.