For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chandgad News | परिस्थिती आडवी आली, पण जिद्द नाही! चंदगडच्या महादेवची 'महानिर्मिती'त कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पदी निवड

05:20 PM Apr 30, 2026 IST | NEETA POTDAR
chandgad news   परिस्थिती आडवी आली  पण जिद्द नाही  चंदगडच्या महादेवची  महानिर्मिती त कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पदी निवड
Advertisement

                      निट्टूरच्या महादेवांचा महानिर्मितीत ‘कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ’ पदावर निवड

Advertisement

चंदगड : तालुक्यातील निट्टूर येथील भूमिपुत्र महादेव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महानिर्मिती) मध्ये ‘कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ’ पदावर निवड मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.

अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या महादेव यांनी परिस्थितीची कधीही सबब न सांगता शिक्षणाची वाट निवडली. उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतानाच त्यांनी उदरनिर्वाहासाठी खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये अध्यापन केले. तसेच विविध ठिकाणी तासिका तत्त्वावर (CHB) काम करत त्यांनी आपला अभ्यास अखंड सुरू ठेवला.

Advertisement

त्यांचा यशाचा प्रवास खडतर होता. रसायनशास्त्र या विषयात त्यांनी तब्बल सात वेळा ‘NET JRF’ परीक्षा उत्तीर्ण करून आपले विषयातील प्रभुत्व सिद्ध केले. याआधी त्यांनी DRDO, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड (NFL) तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) जिओसायंटिस्ट (वर्ग-१) परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, अनेक वेळा शेवटच्या टप्प्यात अपयश आले.

तरीही अपयशाने न खचता त्यांनी जिद्दीने पुन्हा प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्यांच्या चिकाटी, सातत्य आणि कष्टांना यशाची जोड मिळाली आणि ‘महानिर्मिती’सारख्या शासकीय संस्थेत त्यांची निवड झाली. महादेव यांच्या या यशाबद्दल निट्टूर पंचक्रोशीतून तसेच शैक्षणिक व मित्रपरिवारातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या संघर्षमय यशकथेने अनेक तरुणांना नव्या उमेदीने प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली आहे.

Advertisement

.