स्मार्ट पणजीत ‘सिने नॅशनल’ची दुरवस्था; जीर्ण इमारतीला वृक्षांचा विळखा
पणजी : जय नाईक : कोट्यवधी रुपये खर्च करून राजधानी पणजीचा स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास करण्यात आला असला, तरी शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘सिने नॅशनल’ थिएटरची इमारत मात्र भग्नावस्थेत आहे. एकेकाळी पणजीची शान आणि गोव्यातील जुन्या सिंगल-स्क्रीन चित्रपटगृहांपैकी एक असलेली ही वास्तू सध्या जीर्ण अवस्थेत असून, तिच्याभोवती मोठ्या प्रमाणात झाडाझुडपांचा विळखा पडला आहे.
पोर्तुगीज राजवटीच्या काळात 1933 ते 1935 दरम्यान ‘सिनेमा इडन’ या नावाने सुरू झालेल्या या चित्रपटगृहाला गोव्याच्या चित्रपट आणि सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. गोवा मुक्तीनंतर काही वर्षांनी ही मालमत्ता तत्कालीन पणजी नगरपालिकेने (सध्याचे कॉर्पोरेशन ऑफ द सिटी ऑफ पणजी - सीसीपी) मे. राव अँड कंपनीला 30 वर्षांच्या भाडेकरारावर दिली होती. हा करार 2005 मध्ये संपला.
करार संपल्यानंतर सीसीपीने राव यांचा ताबा अनधिकृत मानून जागा आणि इमारत पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. मात्र, इमारतीतील तळमजल्यावरील व्यावसायिक आस्थापने आणि दुकानदारांनी जागा रिक्त करण्यास विरोध केला. काही संबंधितांनी न्यायालयीन स्थगिती आदेश मिळविण्यासाठीही प्रयत्न केल्याने हे प्रकरण कायदेशीर कचाट्यात अडकले.
यामुळे या मोक्याच्या जागेच्या पुनर्विकासाच्या योजना रखडल्या असून, देखभालीअभावी इमारतीची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत गेली. इमारत धोकादायक स्थितीत पोहोचल्यानंतर 2024 मध्ये सीसीपीने ती अधिकृतपणे सील केली.
इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मनपाने स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासणी केली असून, सल्लागार अभियंत्याकडून फिटनेस अहवालही घेण्यात आला आहे. मात्र, प्रशासकीय आणि कायदेशीर अडचणींमुळे पुढील कार्यवाहीला अद्याप वेग आलेला नाही.
सध्या या जीर्ण वास्तूभोवती मोठ्या प्रमाणात वृक्षवेली आणि झाडाझुडपे वाढली आहेत. इमारतीच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या परिसरापासून दूर राहावे तसेच इमारतीजवळ वाहने उभी करू नयेत, असा सल्ला मनपाकडून देण्यात आला आहे.
एकेकाळी पणजीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेली ‘सिने नॅशनल’ची वास्तू आज न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियेत अडकून भग्नावस्थेत पोहोचल्याने तिच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.