सिगारेटची जागा घेतली मावा, गुटख्याने...सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटली
विद्याधर पिंपळे कोल्हापूर
सिगारेट ओढणे हे आरोग्यास हानीकारक आहे. तरी देखील चोरून सिगारेट ओढणारा मोठा युवा वर्ग आहे. पण आता या सिगारेटची जागा मावा, गुटखा व गांज्यांने घेतली असल्याने, पानपट्टी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांनी घटल्याचे, पानपट्टी व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
सिगारेट व्यतिरिक्त इतर तंबाखूजन्य (गुटखा, मावा) पदार्थावर सरकारने निर्बंध आणले आहेत. तरी देखील युवा पिढीकडून चोरट्या मार्गाने व निर्बंध आणलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. कोल्हापूर पानपट्टी संघटनेने या विक्रीवर बॅन केला आहे. मात्र चोरट्या मार्गाने या गुटखा, मावा व गांज्याची विक्री होत असल्याचे चित्र आहे.
तंबाखूजन्य पदार्थावर 78 टक्के इतका कर असल्याने, सिगारेट सुध्दा महाग झाले आहे. त्यामुळे युवा पिढी सिगारेटपेक्षा गुटखा, मावा व गांज्याकडे वळू लागल्याची चर्चा आहे. गुजरात व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये तंबाखूवर निर्बंध आणले आहेत. तर महाराष्ट्रात गुटख्यावरही बंदी आणली आहे. असे असूनही, कर्नाटकातून गुटख्याची चोरटी आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा गुटखा कोल्हापूर शहरासह इतर भागामध्ये तस्करांकडून पोहोचवला जात आहे. एका शिक्षकाचा ‘लठ्ठेs’बाज मुलगाही यामध्ये असून, त्याला यापूर्वी अन्न, औषध प्रशासनाने ताब्यात घेतले होते. यामागे मोठा राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. मोठे मासे सोडून किरकोळ पानपट्टी व्यावसायिकांना मात्र वेगवेगळी कलमे लावून, त्रास दिला जात आहे. याचा परिणाम पानपट्टी व्यावसायिकांवर होऊ लागला आहे.
78 टक्के करामुळे अनब्रँडेड सिगारेट बाजारात
सिगारेटची किंमत ही तंबाखूची गुणवता, कालावधी, सिगारेटचा आकार, पॅकेजिंग, लेबलिंग व त्यावरील 78 टक्के करामुळे सिगारेट महाग होत आहे. याचा परिणाम अनब्रॅंडेड सिगारेटचा सुळसुळाट वाढला आहे. ब्रॅंडेड सिगारेटचे पाकीट 50 रूपयाला तर अनब्रॅंडेड सिगारेटचे पाकीट चार ते पाच रूपयांला विकले जात आहे. ही अनब्रॅंडेड सिगारेटस् मध्य प्रदेश, नोएडा येथून येत आहे. सिगारेट दर महिन्याला वेगवेगळया नावाने बाजारात आणले जात आहे. असे सिगारेट पानपट्टीमध्ये विकले जात नसून, इतर ठिकाणी विकले जात आहे.
चार कंपन्यांचे वर्चस्व
सिगारेट कंपन्यामध्ये सध्या चार कंपन्यांचे वर्चस्व आहे. यामध्ये आयटीसी व मलबोरो आघाडीवर असून, त्यापाठोपाठ फोर स्क्वेअर व चार मिनार कंपनीचे सिगारेट बाजारात विकले जात आहे. नॅशनल कंपनीचे कूल व गोल्डन टोबॅकोचे पनामा सिगारेट बाजारातून गायब झाले आहे.
पानपट्टी व्यवसायावर परिणाम
मावा, गुटखा व गांज्यामुळे पानपट्टी व्यवसायावर परिणाम झाला आहे. पूर्वी पानपट्टी दुकानामध्ये फक्त पानपट्टी खाण्यासाठी लोक येत होते. बंदी असलेल्या तंबाखूजन्य वस्तू चोरट्या मार्गाने बाहेर विकले जात आहे. याचा परिणाम पानपट्टी व्यवसायावर झाला आहे. संघटनेमार्फत गुटखा, मावा विरोधात जागृती केली जात आहे.
-अरूण सावंत, अध्यक्ष, कोल्हापूर पानपट्टी संघटना