चेंगराचेंगरीची सीआयडी, न्यायालयीन चौकशी
बेंगळूर पोलीस आयुक्तांसह पाच पोलीस अधिकारी निलंबित : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : आरसीबी, केएससीए, इव्हेंट मॅनेजनेंटच्या प्रतिनिधींना अटक होणार
- निवृत्त न्या. मायकल डी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय आयोग
- 30 दिवसांत अहवाल सादर करण्याची आयोगाला सूचना
- आरसीबी संघाच्या सत्काराचे आयोजन करणाऱ्यांवरही कारवाई
प्रतिनिधी/बेंगळूर
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाने तब्बल 18 वर्षांनी आयपीएल- चषक पटकावल्यानंतर बुधवारी बेंगळुरात आयोजिलेल्या विजयोत्सवाला गालबोट लागले होते. चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. याची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेत न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय आयोग तसेच घटनेप्रकरणी बेंगळूर पोलीस आयुक्त बी. दयानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. घटनेला आरसीबी प्रॅन्चाईजी, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना या संस्थांच्या प्रतिनिधींविरुद्ध एफआयआर दाखल झाला असून अटकेची सूचना देण्यात आली आहे. या घटनेला कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून वरील तीन संस्थांची सीआयडीमार्फत चौकशीचा आदेशही देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. प्रारंभी चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीनुसार चेंगराचेंगरीच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मायकल डी. कुन्हा यांच्या नेतृत्वाखाली एकसदस्यीय आयोग नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. 30 दिवसांत तपास पूर्ण करण्याची सूचना आयोगाला देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडूनही चूक झाल्याचे बैठकीवेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
बेंगळूर पोलीस आयुक्त बी. दयानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार, बेंगळूर सेंट्रल विभागाचे डीसीपी एच. टी. राजशेखर, एसीपी बालकृष्ण, कब्बनपार्क पोलीस स्थानकाचे निरीक्षक गिरीश ए. के. यांना निलंबित करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दुर्घटनेला हे अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. त्यांचा बेजबाबदारपणा, दुर्लक्ष दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यंत्र्यांनी सांगितले.
सुरक्षा अधिकाऱ्यांची सूचना धुडकावली
सुरक्षा अधिकाऱ्यांची सूचना धुडकावून आरसीबी संघाच्या सत्काराचे आयोजन केलेल्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना, आरसीबी आणि डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी या तीन संस्थांच्या प्रतिनिधींना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संस्थांविरुद्ध एफआयआरही दाखल झाला आहे. मंत्रिमंडळ बैठकीवेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, डॉ. एम. सी. सुधाकर, मंत्री एच. के. पाटील, डॉ. एच. सी. महादेसवप्पा व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तीन संस्थांची होणार सीआयडीद्वारे चौकशी
चेंगराचेंगरीच्या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. घटना घडण्यास आरसीबी प्रॅन्चाईजी, डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (केएससीए) कारणीभूत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या संस्था दुर्घटनेला कारणीभूत आहेत का?, त्यांच्याकडून कोणत्या चुका झाल्या? याचा तपास सीआयडीमार्फत केला जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला.