For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘सीआयडी’, ‘आहट’ मालिकेचे निर्माते बी. पी. सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

04:33 PM Oct 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘सीआयडी’  ‘आहट’ मालिकेचे निर्माते बी  पी  सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन  77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement

मुंबई : भारतीय टेलिव्हिजनवरील लोकप्रिय क्राइम शो ‘सीआयडी’ आणि हॉरर मालिका ‘आहट’ यांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बृजेंद्र पाल सिंह (बी. पी. सिंह) यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनविश्वात शोक व्यक्त केला जात आहे.

Advertisement

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. बी. पी. सिंह यांच्या निधनाने भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाला गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबीयांप्रतीही त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, 28 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

‘सीआयडी’मुळे देशभरात मिळाली ओळख

Advertisement

बी. पी. सिंह यांनी 1998 मध्ये ‘सीआयडी’ या क्राइम मालिकेची सुरुवात केली. गुन्ह्यांचा तपास, रहस्य आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आधारित या मालिकेने अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. भारतीय टेलिव्हिजनवरील दीर्घकाळ चाललेल्या लोकप्रिय क्राइम मालिकांमध्ये ‘सीआयडी’चा समावेश होतो.

या मालिकेच्या निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच त्यांनी काही भागांमध्ये डीसीपी शमशेर सिंह चित्रोले ही भूमिकाही साकारली होती. मालिकेच्या लोकप्रियतेमुळे त्यांना देशभरात मोठी ओळख मिळाली.

‘आहट’मधून हॉरर मालिकांना नवी ओळख

बी. पी. सिंह यांचे योगदान केवळ क्राइम मालिकांपुरते मर्यादित नव्हते. 1995 मध्ये सुरू झालेल्या ‘आहट’ या हॉरर मालिकेने भारतीय टेलिव्हिजनवर भयकथांच्या प्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली. ही मालिका 2015 पर्यंत विविध टप्प्यांत प्रसारित झाली.

याशिवाय ‘खाकी’, ‘अभय’ आणि ‘सुपरकॉप्स व्हर्सेस सुपर व्हिलेन्स’ यांसारख्या मालिकांच्या निर्मिती-दिग्दर्शनातही त्यांचा सहभाग होता.

111 मिनिटांच्या सिंगल-शॉट एपिसोडची ऐतिहासिक नोंद

‘सीआयडी’ मालिकेच्या माध्यमातून बी. पी. सिंह यांनी टेलिव्हिजनच्या इतिहासात एक वेगळा प्रयोग केला होता. ऑक्टोबर 2004 मध्ये मालिकेचा 111 मिनिटांचा विशेष भाग सलग, कट न देता एकाच शॉटमध्ये चित्रित करण्यात आला. या प्रयोगाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्याचे सांगितले जाते.

Advertisement
Tags :

.