राज्यातील ‘आप’च्या भविष्यावर चर्चिलनी केला प्रश्न
आमदार वेन्झी व्हिएगस यांचीही उडविली खिल्ली
प्रतिनिधी/ मडगाव
बाणावलीचे माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी अलीकडील जिल्हा पंचायत निवडणुकीतील आम आदमी पक्षाच्या (आप) कामगिरीवरून विशेषत: बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांची खिल्ली उडवली आहे तसेच गोव्यामध्ये ‘आप’च्या भविष्यावरही प्रश्न उपस्थित केले आहे.
माध्यमांशी बोलताना आलेमाव यांनी व्हिएगस यांनी केलेल्या ‘शोले’ चित्रपटातील ‘सांबा, कितने आदमी थे ?’ या संवादाचा संदर्भ देणाऱ्या पूर्वीच्या विधानाची आठवण करून दिली. तोच संवाद ‘आप’ला उद्देशून वापरत आलेमाव म्हणाले की, आता प्रश्न हा आहे की, ‘आप’च्या किती उमेदवारांनी जिल्हा पंचायत निवडणूक लढवली आणि त्यापैकी किती जण हरले. पक्षाच्या एका उमेदवाराव्यतिरिक्त बाकी सर्व जण पराभूत झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आलेमाव म्हणाले की, जिल्हा पंचायतीच्या निकालांमुळे राज्यातील ‘आप’च्या स्थानाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. याव्यतिरिक्त बाणावलीमधील आगामी विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत आलेमाव यांनी सांगितले की, ते जिल्हा पंचायत निवडणुकीपासून दूर राहिले होते. विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाचे समीकरण खूप वेगळे असेल. कारण त्यांच्या संभाव्य प्रवेशामुळे ‘आप’, काँग्रेस आणि इतरांसोबत आणखी एक दावेदार रिंगणात येईल, ज्यामुळे ही निवडणूक बहुरंगी लढत बनेल.