For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बाणावलीतून मी, नावेलीतून कन्या वालंका निवडणूक लढवणार : माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव

03:58 PM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाणावलीतून मी  नावेलीतून कन्या वालंका निवडणूक लढवणार   माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव
Advertisement
वास्को : आगामी विधानसभा निवडणुकीत आपण बाणावली मतदारसंघातून, तर आपली कन्या वालंका आलेमाव नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी स्पष्ट केले. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास प्राधान्य असेल; मात्र उमेदवारी मिळाली नाही, तरी लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वार्का येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत चर्चिल आलेमाव बोलत होते. मागील विधानसभा निवडणुकीत वालंका यांना नावेली मतदारसंघातून अल्प मतांच्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. यंदा मात्र त्यांना आमदार बनवण्याचा आपला निर्धार असल्याचे चर्चिल यांनी सांगितले. नावेली आणि बाणावली या दोन्ही मतदारसंघांत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.

Advertisement

आपली पहिली पसंती काँग्रेस पक्षाला असून, पैसे देऊन पक्षाचे तिकीट घेण्याची आपली इच्छा नसल्याचे चर्चिल आलेमाव यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये उमेदवारी विकली जाते का, तसेच स्थानिक किंवा केंद्रीय पातळीवरील कोणाचा त्यात सहभाग आहे, याबाबत विचारले असता, पत्रकारांनी त्याचा शोध घ्यावा, असे त्यांनी म्हटले.

वालंका आलेमाव या गोवा फुटबॉल संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या असून, समाजसेवेच्या क्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले आहे. या कामाच्या जोरावर त्या नावेली मतदारसंघातून निश्चितच विजय मिळवतील, असा विश्वास चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केला.

Advertisement

करमणे मैदानाच्या श्रेयवादावरून टीका

दरम्यान, करमणे येथील मैदानाच्या उभारणीवरून चर्चिल आलेमाव यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली. आपण बाणावलीचे आमदार असताना या मैदानाची पायाभरणी केली होती आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केला होता. पुढे करमणे क्लब समितीचे अध्यक्ष पुरी व अन्य पदाधिकाऱ्यांनीही यासाठी प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले.

मैदानाचे काम पूर्ण होऊन उद्घाटन जवळ आल्यानंतर सध्याचे आमदार त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी नाव न घेता केला.

यावेळी करमणे क्लबचे अध्यक्ष आणि खजिनदार उपस्थित होते. चर्चिल आलेमाव यांनी आमदार असताना मैदानाची पायाभरणी केली होती आणि निधी मंजूर करून घेतला होता. त्यामुळे मैदान उभारणीचे श्रेय त्यांनाही तितकेच जाते, असे क्लब पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.