For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बोगस रेती वाहतूक पास बनवून सरकाराला लावला जातोय ‘चुना’

12:13 PM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बोगस रेती वाहतूक पास बनवून सरकाराला लावला जातोय ‘चुना’
Advertisement

पास बोगस असल्याचे खाण खात्याकडून सिद्ध : राज्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले

Advertisement

पणजी : राज्य खाण व भूगर्भ खात्याचे संचालक नारायण गाड यांनी काल शुक्रवारी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात डिचोली पोलिसांना मिळालेला 3 ऑक्टोबर 2023 तारखेचा रेती वाहतुकीसाठीचा ‘ट्रान्झिट पास’ (टीपी ) बोगस असल्याचे मान्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकायदेशीर ‘टीपी’ विरोधात एफआयर दाखल करून तपास करण्याची मागणीही खात्याने केली आहे. यामुळे बोगस वाहतूक पास बनवून बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करण्याऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा नदी रेती संरक्षण नेटवर्कतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी राज्यात बोगस वाहतूक पास बनवून बेकायदेशीरपणे रेती वाहतूक केली जात असल्याचे न्यायालयात उघड झाले आहे.

नार्वे येथे मोठा रेतीसाठा

Advertisement

डिचोली पोलिसांनी उच्च न्यायालयात 3 ऑक्टोबर 2023 रोजी नार्वे येथे मोठ्या प्रमाणात रेतीसाठा मिळाला असल्याचे सांगितले होते. सदर रेती कुडाळ-महाराष्ट्र येथून एका इसमाने वाहतूक पासद्वारे आणल्याचे दाखवण्यात आले होते. यासंबंधी अधिक तपास करून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्या आदेशानुसार खाण खात्याचे संचालक गाड यांनी काल शुक्रवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.

 टीपी ‘भूमिजा’ प्रणालीद्वारे नाही

संचालक गाड यांनी या बनावट ‘टीपी’प्रकरणी तपास पूर्ण केला असता तो पास अधिकृतरित्या देण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी एका व्यक्तीने माहिती हक्क कायद्याखाली अर्ज केल्यानंतर गोवा इलेक्ट्रॉनिक्स ली.च्या नोंदी तपासल्या असता तो पास सरकारच्या अधिकृत ‘भूमिजा’ प्रणालीतून दिला गेला नसल्याचेही उघड झाले. हा बोगस पास हा हिमनगाचे टोक असू शकते. या प्रकरणाची चौकशी केली तर आतंरराज्य रेती उपसा आणि वाहतूक करणारी टोळी सापडण्याची शक्यता आहे.

टीपी तपासणीसाठी अॅपचा वापर

राज्यात आता बोगस वाहतूक पास बनवून बेकायदेशीरपणे रेती वाहतूक करण्याचे ‘रॅकेट’ सुऊ असून सरकारची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे. ही फसवणूक टाळण्यासाठी ‘युनिक बारकोड’, ‘वॉटरमार्क’, आणि ‘क्यूआर कोड’ घालून काळजी घेतली जाते. मात्र हे बोगस वाहतूक पास प्रकरण उघड झाल्यानंतर खात्यातर्फे 10 एप्रिल रोजी परिपत्रकाद्वारे नवीन सुरक्षा प्रणालीचा वापर करण्यात येत असल्याचे सर्व संबंधित खात्याना आणि पोलिसांना कळवण्यात आले आहे. चेकपोस्टवरील पोलिसांना वाहतूक पास तपासणीसाठी ‘ट्रिपशीट स्कॅनिंग’ अॅप वापरण्यास सांगितले आहे. रेती वाहतूक करणाऱ्या ज्या ट्रकांना अधिकृत वाहतूक पास देण्यात आला आहे, त्यांना समोरच्या काचेवर ‘परवानगी प्राप्त’ असे लिहावे लागणार आहे. यासाठी या ट्रकांना फक्त एकदाच स्कॅन होणारा वाहतूक पास  दिला जाणार असून तो दुसऱ्यांदा स्कॅन केल्यास ‘परवानगी नाही’ असा स्पष्ट संदेश येतो. यामुळे, बेकायदेशीर रेती वाहतुकीला आळा बसणार असल्याचे संचालक नारायण गाड यांनी नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.