For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजारपेठेत ख्रिसमसच्या खरेदीची गर्दी

10:12 AM Dec 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
बाजारपेठेत ख्रिसमसच्या खरेदीची गर्दी
Advertisement

ख्रिसमस अवघ्या आठवड्यावर : सजावटीच्या वस्तूंनी शहरातील दालने सजली

Advertisement

बेळगाव : डिसेंबर सुरू झाला तसा शहराला नाताळची चाहुल लागली आहे. व्यापारी आणि विक्रेत्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच ख्रिसमसची तयारी सुरू केली आहे. मात्र, आता ख्रिसमस अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठेत ख्रिसमसच्या खरेदीसाठी गर्दी दिसू लागली आहे. बेळगावमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने ख्रिसमस साजरा करतात. मुख्य म्हणजे बेळगावमध्ये बेळगाव डायोसिसच्या अंतर्गत अनेक चर्च कार्यरत आहेत. या सर्व चर्चमध्ये ख्रिसमसच्यादृष्टीने तयारी सुरू झाली आहे. ख्रिसमस जवळ येईल तसा सर्व चर्चवर विद्युत रोषणाई करून परिसर उजळवला जाणार आहे. त्याचबरोबर बाजारपेठेतही ख्रिसमसची धूम दिसून येत आहे. ख्रिसमस म्हटले की सॅन्ताक्लॉज हमखास येतोच. ही एक मुलांच्या भावविश्वाला आनंदाची किनार लावणारी गोष्ट आहे. सॅन्ता खराच असतो अशा निरागस समजुतीमध्ये वावरणाऱ्या मुलांना ख्रिसमस दिवशी आपल्या उशापाशी भेटवस्तु पाहून होणारा आनंद पालकांचाही आनंद द्विगुणीत करणारा असतो. म्हणूनच बाजारपेठेत सॅन्ताक्लॉजच्या प्रतिकृतींपासून पोषाखापर्यंत तसेच सजावटीच्या अनेक वस्तु दाखल झाल्या आहेत.

शहरातील पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, मारुती गल्ली, टिळकवाडीमधील आरपीडी कॉर्नर, देशमुख रोड, शहापूरमधील खडेबाजार यासह शहरातील उपनगरांमध्ये आणि मॉलमध्येही ख्रिसमससाठीच्या सजावटीच्या वस्तुंनी दालने सजली आहेत. यामध्ये ख्रिसमस ट्री, त्यावर लावण्यासाठी विद्युत माळा, झिरमिळ्या, वेगवेगळ्या प्रकारच्या चांदण्यांच्या प्रतिकृती, आकाशदिवे, जिंगलबेल्स, मेंढ्यांच्या प्रतिकृती, ख्रिस्त जन्माचा आकर्षक देखावा स्पष्ट करणारे व्रेट, फुगे, वेगवेगळ्या रंगांचे चकाकणारे बॉक्स अशा एक ना अनेक वस्तु लक्ष वेधून घेत आहेत. सॅन्ताक्लॉजचे पोषाख, त्याच्या टोप्या आहेतच. परंतु सॅन्ताक्लॉजच्या की-चेन्सचीसुद्धा भर पडली आहे. बालचमुंचे लक्ष वेधून घेण्यासाठी दुकानदारांनी दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ सॅन्ताक्लॉजच्या प्रतिकृती ठेवल्या आहेत. येत्या काही दिवसांत चर्चच्या पुढाकाराने ‘कॅरॉल सिंगिंग सुरू होईल. शिवाय शाळांमध्येसुद्धा अलीकडे ख्रिसमस साजरा केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ख्रिसमसच्या साहित्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून खरेदी सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.