For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात आजपासून राज्यात आजपासून नाताळ उत्सवाची पर्वणी

03:10 PM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
राज्यात आजपासून राज्यात आजपासून नाताळ उत्सवाची पर्वणी
Advertisement

पणजी : आज सायंकाळपासून गोव्यात नाताळची धूम सुरू होत आहे. राजधानी पणजीसह गोव्याच्या किनारी भागात तसेच दक्षिण गोव्यात सालसेतमध्ये मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधवांनी नाताळनिमित्त सजावट केली असून नाताळच्या स्वागतासाठी ख्रिश्चन मंडळी सज्ज झाली आहे. आज बुधवारी मध्यरात्री नाताळनिमित्त गोव्यातील विविध चर्चमध्ये प्रार्थना होतील. मध्यरात्री 12 नंतर चर्चमधील फादर्स, येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याचे जाहीर करतील. राज्यात नाताळ तथा ख्रिसमसनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राजधानी पणजीमध्ये अनेक महत्त्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाईने शहर सजविण्यात आले आहे. पणजी चर्च चौकामध्ये विविध प्रकारची विद्युत रोषणाई करण्यात आली असून ही सजावट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी सायंकाळी दिसून येते.

Advertisement

किनारपट्टी भागात विशेषत: मोरजी, वागातोर, हणजूण, कळंगुट, कांदोळी, सिकेरी तसेच दक्षिण गोव्यात कोलवा, मोबोर व काणकोणमधील काही किनारपट्टी भागात पर्यटकांनी एकच गर्दी केलेली आहे आणि त्या ठिकाणी देखील हॉटेल चालकांनी आकर्षक पद्धतीची विद्युत रोषणाई केली आहे. आज 24 रोजी सायंकाळपासूनच नाताळची धूम गोव्यात अनुभवायला मिळणार आहे. घरोघरी ख्रिस्ती नागरिक ख्रिसमस ट्री उभी करणार असून त्याचबरोबर येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्याचा देखावा अर्थात गोठा उभा केला जाईल. गेले काही दिवस नाताळनिमित्त ख्रिस्ती नागरिकांनी तयारी सुरू केली असून आज सायंकाळपर्यंत सारी यंत्रणा सज्ज होईल. मध्यरात्री गोव्यातील सर्व चर्चमध्ये प्रार्थना होतील तसेच घंटानाद होईल आणि ख्रिसमस पर्वाला प्रारंभ होईल.

दरम्यान ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्याबाहेर गेलेले अनेक गोमंतकीय ख्रिस्ती मंडळी गोव्यात आली आहे. परदेशात असलेले देखील मूळ गोमंतकीय आपल्या गावातील मूळ घरात परतले असून गेली काही महिने बंद असलेली घरे विद्युत रोषणाईने झगमगली आहेत. याचबरोबर नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात पोचले आहेत. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने खास रेलगाड्या सुरू केलेल्या आहेत. येण्यासाठी बस गाड्यांची तिकीट दरात बरीच वाढ झालेली आहे. विमान प्रवास देखील खूपच महागलेला आहे. तरी देखील पर्यटकांमधील उत्साह मात्र मुळीच कमी झालेला नाही. गोव्याच्या विविध किनारपट्टी भागात हजारोंच्या संख्येने पर्यटक पोहोचले आहेत. नाताळच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झालेला आहे आणि ख्रिस्ती नागरिकांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.