पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ख्रिश्चन संघटनांकडून निषेध
चन्नम्मा चौकात कँडल मार्चद्वारे श्रद्धांजली
प्रतिनिधी/ बेळगाव
काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी विविध ख्रिश्चन संघटनांनी एकत्रितरित्या कँडल मार्च काढून निषेध व्यक्त केला. कोर्ट येथील सेंट्रल मेथॉडिस्ट चर्चपासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत कँडल मार्च काढण्यात आला. हा पर्यटकांवरील हल्ला नसून देशावरील हल्ला आहे आणि याला उत्तर देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
ऑल कर्नाटका युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्स, बेलगाम पास्टर्स अँड ख्रिश्चन लिडर्स असोसिएशन, मेथॉडिस्ट एपीस्कोपल चर्च इन सदर्न एशिया या संघटनांच्यावतीने कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना अॅड. जॉन यांनी घटनेचा निषेध केला. लुईस रॉड्रीग्ज म्हणाले, दहशतवाद हा कोणत्याही धर्माचा नसतो. संपूर्ण जग दहशतवादाच्या विरोधात लढा उभारत आहे. दहशतवादाविरोधात भारताने कडक कारवाई करून दहशतवाद कायमचा संपवून टाकावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विविध ख्रिश्चन संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.