बेळगाव परिसरातील ख्रिस्ती बांधवांकडून ‘ऑल सोल्स डे’चे आचरण
बेळगाव : जगभरात 2 नोव्हेंबर ‘ऑल सोल्स डे’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने रविवारी बेळगाव आणि परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी आपल्या कुटुंबातील दिवंगतांना नातेवाईक व जीवलग व्यक्तींचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्मशानभूमी पवित्र मानली जात नसली तरी ख्रिस्ती धर्मानुसार आपल्या कुटुंबीयांच्या आत्म्यांचे पावित्र्य आणि त्यांचे आशीर्वाद यावर विश्वास ठेवला जातो. त्यामुळेच त्यांना दफन केलेल्या स्थळी फुलांनी सजवून विशेष प्रार्थना केल्या जातात. शहरातील विविध ख्रिस्ती दफनभूमींमध्ये प्रार्थनासेवांचे आयोजन करण्यात आले होते. गोल्फ कोर्सजवळील, शहापूरमधील व इतर दफनभूमींमध्ये प्रार्थना करण्यात आल्या.
गोल्फ कोर्सजवळील जुन्या स्मशानभूमीत झालेल्या प्रार्थनासेवेत रेव्हरंड फादर विजय मेंडीथ यांनी मुख्य याजक म्हणून सेवा बजावली. फादर नेल्सन पिंटो, फादर मायकल फर्नांडिस, फादर अल्बर्ट डिसोजा, फादर राजेंद्र प्रसाद, फादर डेनिस रॉड्रीग्ज सहभागी झाले होते. यावेळी फादर सिरील ब्रॅग्ज म्हणाले, पृथ्वीवरील जीवन हे तात्पुरते आहे. आपण स्मशानभूमीत प्रार्थना करत असताना दिवंगत आत्मे आपल्याला स्मरण करून देतात, की उद्या आपलीही पाळी येईल. त्यामुळे चांगल्या कर्माद्वारे प्रार्थनेच्या माध्यमातून आपण नेहमी मृत्युसाठी सज्ज राहिले पाहिजे. कारण मृत्यू प्रत्येकासाठी अटळ आहे. प्रार्थनेनंतर कुटुंबीयांनी आपल्या प्रियजनांच्या कबरींवर मेणबत्त्या लावल्या.