For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चौकुळ केगदवाडीत अस्वलाचा वृद्ध महिलेवर हल्ला; महिला गंभीर जखमी; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

07:08 PM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
चौकुळ केगदवाडीत अस्वलाचा वृद्ध महिलेवर हल्ला  महिला गंभीर जखमी  ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
Advertisement

आंबोली : चौकुळ केगदवाडी येथे घराशेजारी काम करत असलेल्या 70 वर्षीय सावित्री बुधाजी परब यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली असून, त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडीमार्गे गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisement

सावित्री परब या चौकुळ केगदवाडी येथे एकट्याच राहतात. त्यांचा मुलगा आणि सून कामानिमित्त मुंबई येथे असतात. दुपारच्या सुमारास त्या घराशेजारी काम करत असताना पाठीमागून अचानक आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. अस्वलाने पंज्याने त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

हल्ल्यावेळी त्यांनी आरडाओरड केल्याने अस्वल तेथून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर आंबोली वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी सावित्री परब यांना प्रथम आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

Advertisement

प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सावंतवाडी येथील कॉटेज रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आल्याचे समजते.

चौकुळ परिसरात यापूर्वीही अस्वलांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेषतः दिवसा अस्वलाने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिसरात आवश्यक उपाययोजना करून अस्वलांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Advertisement
Tags :

.