For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निसर्गाच्या कोंदणात चोर्ला सड्याचा किल्ला

06:14 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
निसर्गाच्या कोंदणात चोर्ला सड्याचा किल्ला
Advertisement

कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिह्याच्या खानापूर तालुक्यात येणाऱ्या चोर्ला गावाच्या एका टोकाला जेथे महाराष्ट्राची सीमा भीडते तेथे सड्याचा किल्ला आहे. चोर्ला या गावाची सीमा एका बाजूला कर्नाटकातल्या माण, कणकुंबी तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या दोडामार्ग तालुक्यातल्या विर्डी आणि मांगेली तसेच गोव्यातल्या सत्तरीतल्या हिवरे-खुर्द गावांशी भीडलेली आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून उसळलेल्या लाव्हा रसातून दख्खनच्या पठाराची निर्मिती झाल्याची साक्ष देणारे शिलाखंड त्याचे वैभव आहे.

Advertisement

रामेश्वर, सातेरी, बेताळ आदी दैवतांच्या आशीर्वचनात विसावलेल्या या गावात, महाराष्ट्रातल्या मांगेली गावाच्या माथी सड्याचा किल्ला गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांतल्या जुन्या पायवाटा तसेच चोर्ला आणि मांगेली घाटांतून चालणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवत असे. तेथे असलेला हा किल्ला सध्या जांबोटकर सरदेसाईशी निगडीत असणाऱ्या सडेकर देसाईच्या ताब्यात होता आणि त्याचे बांधकाम मराठेशाहीतल्या स्थापत्यकलेशी साधर्म्य दर्शविणारे आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या घाट माथ्यावरच्या गावांना जोडणाऱ्या शेकडो वर्षांच्या इतिहासाशी निगडीत चोर्ला घाट आणि मांगेली घाट मार्गात या किल्ल्याची उभारणी केलेली आहे. आज सडा चोर्ला गावात जेमतेम 25च्या आसपास घरांची वस्ती असलेली छोटेखानी वाडी असली तरी इथे असलेल्या वैशिष्ट्यापूर्ण बांधकामाने युक्त असणाऱ्या विहिरी, राजेशाहीला शोभेल असा दुमजली वाडा, जुन्या घरांचे जीर्णावशेष... यावरून सड्याच्या इतिहासाची प्रचिती येते. कधीकाळी बारामाही पेयजल, खाण्यासाठी कंदमुळे आणि रानटी भाजीपाला तसेच राहण्यास शैलाश्रय सड्यात उपलब्ध असल्याने आदिमानवाच्या पाऊलखुणा कधीकाळी इथल्या परिसरात उमटल्या असाव्यात. करवतीचा मोसमी धबधबा आणि वटवाघुळांच्या वास्तव्याने अचंबित करणाऱ्या नैसर्गिक भव्य गुंफा तसेच ठिकठिकाणी उभे असलेले विविध आकारातले शिलाखंड आणि वृक्षवेलींनी तसेच पट्टेरी वाघ, अस्वले, लाजवंती, बिबटे, शेकरू, गवे, चितळ, मेरू, मलय विहार कुशल बेडुक यांच्या वास्तव्याने नटलेले जंगल या साऱ्यातून सड्याच्या नैसर्गिक वैभवाच्या खाणाखुणांचे दर्शन घडते.

Advertisement

याच जंगलाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेपासून काही अंतरावरच्या डोंगराच्या अगदी टोकावरती या किल्ल्याची 2540 फूट उंचीवर अशाप्रकारे उभारणी केली की, त्याच्या पायथ्याखालून येणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे व्हायचे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरच्या दुर्गम ठिकाणी या गिरीदुर्गाची उभारणी करताना त्याची तटबंदी आणि बुऊज अशाप्रकारे बांधले की, शत्रुला आक्रमण करताना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची हमखास वेळ यायची. पूर्वीच्या काळी सडा घाटातून होणाऱ्या व्यापारी, यात्रेकरू यांच्यावर देखरेख ठेवणे शक्य व्हायचे. या किल्ल्याचे प्रामुख्याने माची आणि बालेकिल्ला, अशा दोन भागांत विभाजन करता येते.

म्हैसूरचा वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिपू सुलतानने 1785 साली सड्याचा हा किल्ला सडेकर देसाईंकडून जिंकून घेतला आणि त्यामुळे सडेकर देसाई व त्यांच्या कुटुंबियांना सत्तरीतील केरी येथील राणे सरदेसाई यांच्या वाड्यात आपल्या नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागला. सड्याचा किल्ला ताब्यात आल्याकारणाने टिपू सुलतानच्या सैन्याला ब्रिटीश इंडिया आणि पोर्तुगीज इंडिया यांना जोडणाऱ्या चोर्ला घाटमार्गावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते.

सडे हे ठाणे मराठ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यामुळे सड्याच्या बंदोबस्तासाठी जिवाजी गोपाळ याची रवानगी केली आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्यासमवेत एकविचारे होऊन घाटाचा वगैरे बंदोबस्त राखून, मजबुतीने राहावे, असा आदेश दिला. त्यानंतर 9 जून 1785 रोजी लिहिलेल्या पत्रात, ‘आपल्या पुण्यप्रतापे लडोन सडा हस्तगत जाहला. आम्ही आजवर केरीस होतो. समयामुळे संकतास्तव त्वरा होऊन फिरग्यांच्या ठिकाणी जावे लागले, त्यास काल ज्येष्ठ शु. 1 पदे दिवसी केरीहून निघोन, मुले माणसासुधा सडेस आलो आहो’, असा सडेकर देसायांच्या पत्रात उल्लेख आढळतो. तत्पूर्वी 4 जानेवारी 1689च्या खेम सावंत भोसले देशमुख यांना लिहिलेल्या शुजाअत शहमतपनाह यांच्या पत्रात, चोर्ला घाटाचा संदर्भ ‘शिवचरित्र साहित्य खंड-13’ या ग्रंथात मिळतो.

सडा गावातून किल्ल्यावर येण्यासाठी प्रथम ग्रामदेवी पावणाईचे आणि त्यानंतर वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असणाऱ्या 1712 साली बांधलेल्या विठ्ठल ऊक्मिणी आणि सत्यभामाच्या मंदिराला भेट दिल्यानंतर जीर्णावस्थेत पोहोचलेल्या सडेकर देसाईंच्या दुमजली आणि हवेशीर वाड्याचे दर्शन घेता येते. पोर्तुगीज सरकारविऊद्ध सत्तरी तालुक्यात राणे सरदेसाईनी स्थानिक जनतेच्या मदतीने वेळोवेळी उठाव केले होते. त्यापैकी शेवटचे बंड 1912 साली सोनाळ-सत्तरी येथील शंभु मोरे आणि राणे सरदेसाई यांनी पोर्तुगीजांविऊद्ध केले होते. त्यामुळे शंभु मोरे यांना पकडण्यासाठी पोर्तुगीज सरकारने बक्षीस जाहीर केले होते. त्या बंडातला नेता शंभु मोरे पोर्तुगीजांचा ससेमिरा चुकवून सड्यावरती आला असता, फितुरी आणि षड्यंत्राद्वारे विश्रांती घेताना त्याचा गाढ झोपेतच क्रूरपणे शिरच्छेद सड्यावरती केला होता. शंभु मोरे यांच्या सड्याच्या किल्ल्याच्या परिसरात झालेल्या शिरच्छेदाला येथील काही मंडळी फितुर झाल्याने, गावाची कुप्रसिद्धी झाली होती.

आज इतिहासाचा गौरवशाली वारसा मिरविणारा हा किल्ला, कर्नाटक सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडून विशेष दखल न घेतल्याने, ऊन-पाऊस, वादळ-वारा यांच्या तडाख्यात विकल स्थितीला पोहोचलेला आहे. मुख्य बुऊजावरती आज एक जुनी तोफ तेवढी सुरक्षित ठेवलेली पाहायला मिळते परंतु शतकोत्तर इतिहासाचा साक्षीदार असणारा सड्याचा किल्ला आणि तेथील जुना वाडा आज विस्मृतीत जाण्याच्या वाटेवरती आहे. चोर्ला गावातून महाराष्ट्रातील मांगेली गावाकडे येताना, एका टोकाला असणाऱ्या सडा इथे जाताना दख्खनच्या पठाराशी संलग्न असणाऱ्या विस्तीर्ण पठारांना ओलांडून जावे लागते.

भू-विज्ञानाच्या चमत्कृतींचे त्याचप्रमाणे तिलारी धरणाच्या जलाशयाचे विलोभनीय दर्शन महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरच्या शेवटच्या टोकावर उभे राहिल्यावर होते. जैविक संपदेच्या नाना-विविध घटकांचे वैभव सड्यावरती अनुभवयाला मिळतात. चोर्ला गावातला सड्याचा किल्ला आणि तेथील परिसर नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संचितांचा मनोहारी आविष्कार घडवत असतो.

राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.