For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चोर्ला रस्त्याचे काम रेंगाळले

10:12 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
चोर्ला रस्त्याचे काम रेंगाळले
Advertisement

कंत्राटदाराचा वेळकाढूपणा नडला : पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाची शक्यता कमीच

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यांपैकी रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या 43 कि. मी. रस्त्याचे काम रेंगाळलेले आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाबरोबरच वाहनधारकांमधून तीव्र नाराजी पसरली आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यास कंत्राटदाराला यश मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बेळगाव-चोर्ला-पणजी रस्त्यापैकी रणकुंडये ते चोर्ला रस्त्याच्या कामाला शनिवार दि. 24 फेब्रुवारी रोजी राज्याचे बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कणकुंबी येथे भूमिपूजन करून चालना दिली होती. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत कंत्राटदाराने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवातही केली होती. परंतु वनखात्याकडून रस्त्याच्या कामात नाहक आडकाठी आणली होती. मात्र आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जिल्हा वनाधिकाऱ्यांना बोलावून चोर्ला रस्त्याच्या कामासंदर्भात मार्ग मोकळा करून दिला. त्यानंतर कंत्राटदाराने रणकुंडयेपासून रस्त्याचे पॅचवर्कचे काम सुरू करून जांबोटीपर्यंतचे पॅचवर्क पूर्ण केले. परंतु गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून कंत्राटदाराने रस्त्याचे काम बंद ठेवून दिरंगाई व वेळकाढूपणा चालविला होता. दोन दिवसांपूर्वी जांबोटीपासून रस्त्यावरील मोठमोठे खड्डे जेसीबीच्या साहाय्याने खणून काढून सपाटीकरण केले जात आहे. वास्तविक कालमणी, चिखले, बेटणे, पारवाड क्रॉस, ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडलेले असल्याने कंत्राटदाराने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का अशी शंका निर्माण होत आहे.

Advertisement

रस्त्यासाठी 58 कोटींची निविदा

राष्ट्रीय महामार्ग विभाग कारवार यांच्यातर्फे निविदा मागवल्या होत्या. सदर रस्त्याचे कंत्राट हुबळी येथील मेसर्स एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांनी घेतलेले असून रस्त्यासाठी अंदाजे 58 कोटी रुपयांची निविदा मागविली होती. त्यानुसार 35 कोटी रुपयांचे टेंडर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. चोर्ला रस्त्या दुरुस्ती संदर्भात कणकुंबी भागातून अनेक वेळा निवेदन देऊन व आंदोलन करून त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांपैकी 26.130 कि. मी. ते 69.480 कि. मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43 कि. मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. जर पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण झाले नाही तर यावर्षीही ये रे माझ्या मागल्याच अशी स्थिती निर्माण होईल.

..तर पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल

चोर्ला रस्त्यामुळे बेळगाव-गोवा अशी महत्त्वाची व जवळची वाहतूक असूनही इंधन व वेळेची बचत करणारा हा रस्ता आहे. गोव्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांपैकी चोर्ला मुख्य रस्ता समजला जातो. गेल्या पाच-सहा वर्षापासून या रस्त्याची पूर्णपणे वाताहात झाल्याने रस्त्यावरील ख•dयांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. यावर्षी तरी पावसाळ्dयापूर्वी डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले तर सोयीस्कर होईल असे वाटत असतानाच कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे संशय वाटत आहे. कामाचा जोर वाढवून रस्त्याचे काम वेळेत पूर्ण केले नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.