चोर्ला रस्त्याचे भिजत घोंगडे कधी मार्गी लागणार?
दोन महिन्यातच रस्त्याची झाली वाताहत : ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याच्या कामाबाबत साशंकता
वार्ताहर/कणकुंबी
बेळगावहून गोव्याशी जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांपैकी अतिशय महत्त्वाचा तसेच वेळेची व इंधनाची बचत करणारा बेळगाव-चोर्ला-गोवा रस्ता वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच वाहनधारक व प्रवासी वर्गाच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरला आहे. 1 वर्ष तरी खड्ड्याशिवाय चोर्ला रस्त्यावरुन जाता येईल असे वाटत असताना अवघ्या दीड दोन महिन्यातच चोर्ला रस्त्याची चाळण झाली. त्यामुळे चोर्ला रस्त्याचे भिजत घोंगडे कधी मार्गी लागणार? जांबोटी ते चोर्ला पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने मे महिन्यात डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे भवितव्य अंधकारमय झाले आहे.
बेळगाव-चोर्ला-गोवा या रस्त्यांपैकी रणकुंडये ते गोवा हद्द म्हणजे चोर्ला या 43 कि. मी. पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 58.90 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामधून रस्त्याच्या दोन थरांमध्ये डांबरीकरणासाठी (म्हणजे डबल कोटींग) तसेच कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील नवीन पूल बांधकामासाठी हा निधी मंजूर झाला होता. पहिल्या टप्प्यात जांबोटी ते कणकुंबी, कणकुंबी ते चोर्ला त्यानंतर जांबोटी ते उचवडे क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले. एप्रिल मे मध्ये रस्त्याच्या दुसऱ्या थराच्या डांबरीकरणाला सुरूवात केली. दुसऱ्या थरातील आमटे, चिखले, पारवाड दरम्यानच्या रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. अवघ्या महिन्याभरात डांबरीकरण उखडून गेल्याने रस्त्याच्या कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
वाहनांच्या अपघात संख्येत वाढ
गेल्या तीन-चार महिन्यांत चोर्ला रस्त्याची पुन्हा एकदा दुरवस्था झाली आहे.बेळगाव-चोर्ला-पणजी या रस्त्यांपैकी रणकुंडये ते चोर्ला म्हणजे गोवा हद्दीपर्यंतच्या 43.5 कि. मी. रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला आक्टोबर, नोव्हेंबर दरम्यान सुरुवात करण्यात आली. रस्त्यासाठी सरकारकडून 58.90 कोटी रुपयांची निविदा मागविली होती. त्यानुसार 35.30 कोटी रुपयांचे टेंडर एम. बी. कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेले आहे. अखेर बेळगाव ते चोर्ला गोवा हद्द रस्त्यांपैकी 26.130 कि. मी. ते 69.480 कि. मी. म्हणजे रणकुंडये ते चोर्ला असे 43 कि. मी. रस्त्याच्या डांबरीकरणापैकी चोर्ला ते बैलूर क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम कंत्राटदाराने 90 टक्के पूर्ण केले होते.
परंतु सदर डांबरीकरण दोन महिन्यांतच गायब झाल्याने कंत्राटदाराच्या बेजबाबदार कळसच झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्या भरण्याचे काम देखील शिल्लक राहिल्याने वाहनांच्या अपघातांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून चोर्ला रस्त्याच्या दुतर्फाची माती पावसामुळे वाहून गेल्याने काही ठिकाणी मोठमोठ्या चरी पडल्या आहेत. असे असताना गेल्या पाच-सहावर्षात रस्त्याची साधी दुरुस्ती देखील केली नव्हती. काही ठिकाणी अर्धा ते दीड फुटापर्यंत पावसाळ्dयात पडलेल्या चरी तशाच असून रस्त्याच्या बाजूला वाहन घेणे धोकादायक बनले आहे.
गटारी दुरूस्तींची आवश्यकता
रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी दुतर्फा गटारींची नितांत गरज आहे. परंतु चोर्ला रस्त्याच्या बाबतीत गेल्या पाच-सहा वर्षांपासून गटारींची साफसफाई केली नसल्याने गटारीत पालापाचोळा व दगड माती अडकून भरून गेल्या आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी साफ न केल्याने काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून तर काही ठिकाणी रस्त्याला लागूनच वाहत आहे.
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्याच्या कामात वनखात्याचा नेहमीच अडथळा
बेळगाव-चोर्ला-गोवा रस्ता हा दोन्ही राज्यांसाठी अत्यंत जवळचा असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. गेल्या काही वर्षापासून वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे या रस्त्याच्या विकासाचे काम वेळोवेळी अडवण्यात आले आहे. या रस्त्याचे महत्त्व ओळखून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी 279 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून रस्त्याच्या कामाला चालना दिली होती. परंतु पर्यावरण व वनखात्याने यामध्ये आडकाठी घालून सदर काम बंद पाडले. खड्ड्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाला होता.
त्यामुळे तरूण भारतचे समूह प्रमुख डॉ. किरण ठाकुर यांनी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन चोर्ला रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार नितीन गडकरी यांनी पुन्हा या रस्त्यासाठी 58 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात कामाचा शुभारंभही झाला. दोन्ही बाजूला वाढलेली झुडपे गटारपर्यंत साफ करत असताना कणकुंबी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा आडकाठी घालून रस्त्याचे काम बंद पाडले होते. वास्तविक गटारापासून डांबरीकरणापर्यंत वाढलेली झुडपे साफसफाई करून देण्याचे काम वनखात्याचे असते. परंतु तसे होत नाही. अरुंद रस्त्यामुळे होणाऱ्या अपघाताला वनखातेच जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी दिला आहे.