भारतीय अॅथलेटिक्स संघाचे नेतृत्व चोप्राकडे
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जपानमधील आयची-नागोया येथे 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या 73 सदस्यांच्या भारतीय अॅथलेटिक्स संघाचे नेतृत्व आतापर्यंत दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळविणारा भालाफेकधारक नीरज चोप्राकडे सोपविण्यात आले आहे.
2023 साली झालेल्या हांगझाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्स प्रकारात भारताच्या 16 अॅथलिट्सनी पदके मिळविली होती. पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताचा नीरज चोप्रा हा विद्यमान आशियाई चॅम्पियन आहे. आता या क्रीडा प्रकारात आशियाई स्पर्धेसाठी भारताचा आणखी एक अॅथलिट रोहित यादव यालाही संधी देण्यात आली आहे. रोहित यादवने या क्रीडा प्रकारात 87.68 मी. ची सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी नोंदविली आहे. तसेच त्याने भुवनेश्वरमध्ये झालेल्या विश्व अॅथलेटिक्स आंतरखंडीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते.
भारतीय अॅथलेटिक्स संघामध्ये अविनाश साबळे, तजिंदरपाल सिंग तूर, पारुल चौधरी, अन्नू राणी यांचा समावेश असून या भारतीय अॅथलिट्सनी 2023 च्या हांगझाऊ आशियाई स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारात सुवर्णपदके मिळविली होती. अविनाश साबळेने पुरुषांच्या 3000 मी. स्टिपलचेस प्रकारात सुवर्ण तर 5000 धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक मिळविले होते. तजिंदरपाल सिंग तूरने पुरुषांच्या गोळाफेकीमध्ये गेल्या दोन आशियाई स्पर्धेत सुवर्णपदके मिळविली असून आता तो यावेळी हॅट्ट्रीक साधण्यासाठी सज्ज झाला आहे.
1500 मी., 5000 मी. आणि 3000 मी. स्टिपलचेस महिलांच्या क्रीडा प्रकारात पारुल चौधरी भारताचे प्रतिनिधित्व करेल. ज्योती याराजी, मुरली श्रीशंकर, तेजस्वीन शंकर, गुलवीर सिंग, मोहम्मद अफसल, अॅन्सी सोजन, प्रवीण चित्रावेल आणि विथ्या रामराज तसेच तेजस शिरसे यांचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. 2023 च्या आशियाई स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण, 14 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 29 पदकांची कमाई केली होती.